जिल्हा मुख्यालयी वर्धेत प्रथमच करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने संबंधित परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून अधिक दक्षता घेण्यात येत आहे. शहरातील सर्वात दाट वस्ती असलेल्या रामनगर परिसरात रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अति दक्ष झाले आहे.

करोना संसर्गानंतर जिल्ह्यात परगावतील रुग्णाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते.वर्धेत एकही रुग्ण नसल्याने दिलासादायक वातावरण असतांनाच  वर्धा निवासी असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्यास करोनाची बाधा झाल्याचे उघड होताच, वर्धावासीयांची चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून आज या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी या ठिकाणी भेट देऊन, सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन केले. शिवाय, रुग्णाच्या निकटच्या आठ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी खबरदारी म्हणून काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.  परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणे सुरू झाले आहे, शहरात प्रथमच रुग्ण दिसून आल्यानंतर नागरिक सुद्धा अधिकच सतर्क झाले असल्याचे चित्र आहे.