प्रशांत देशमुख

शेतीसाठी कागदपत्रांची मागणी न करण्याचे निर्देश असतानाही शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या सेंट्रल बँकेला आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आज खडसावले.

बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांना कागदपत्रांची मागणी करू नये, शेतकऱ्यांची यादी नायब तहसिलदारांकडे पाठवावी, बँकेने दिलेल्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांची माहिती बँकेला पूरवण्यात येईल, असे प्रशासनाने निर्देश दिले आहे. पण त्याची दखल न घेता शेतकऱ्यांना कागदपत्रे आणण्याची सक्ती बँकांकडून होत असल्याच्या तक्रारी आहेत.

कागदपत्रांसाठी तहसिल कार्यालयाची पायपीट करणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यालयात प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी शेवटी आ. डॉ. भोयर यांची भेट घेवून त्यांना ही परिस्थिती सांगितली. डॉ. भोयर यांनी पवनारच्या सेंट्रल बँकेकडून कागदपत्रांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पवनारच्या सेंट्रल बँकेला भेट देवून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याबद्दल बजावले.

दरम्यान, बँकेने प्रशासनाशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचनाही केली. खरीप हंगाम उंबरठ्यावर असतांना शेतकऱ्यांना मनस्ताप देणे योग्य नव्हे, असेही आमदारांनी यावेळी स्पष्ट केले.