26 September 2020

News Flash

लोकसभेपूर्वी भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला, मेघे- खा. तडस यांच्यात जुंपली

रविवारी झालेल्या तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार रामदास तडस यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेतून नेत्यांची भाषणे झाली.

संग्रहित छायाचित्र

प्रशांत देशमुख, वर्धा

लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्धा येथे भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला असून दत्ता मेघे आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार तडस यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यास मेघे पिता पुत्राचे पुतळे जाऊ, असा इशारा देण्यात आला असतानाच या वरुन आता दत्ता मेघे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. पुतळे जाळण्याची भाषा विद्यमान खासदाराच्या उपस्थितीत होणे ही बाब लोकशाहीत शोभत नाही, असे मेघे यांनी म्हटले आहे.

रविवारी झालेल्या तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार रामदास तडस यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेतून नेत्यांची भाषणे झाली. आयोजक जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तडस यांची तिकीट नाकारल्यास दत्ता मेघे व सागर मेघे यांचे पुतळे गावोगावी जाळण्याचा इशारा दिला. त्याची री काही वक्त्यांनीही ओढली. सभेत उपस्थित खा. तडस यांनी आपल्या भाषणातून त्याची दखल घेणे टाळले.

हीच बाब ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांना खटकली. ‘लोकसत्ता’च्या वृताचा दाखला घेत ते म्हणाले की, पुतळे जाळण्याची भाषा विद्यमान खासदाराच्या उपस्थितीत होणे ही बाब लोकशाहीत शोभत नाही. उमेदवारीचा प्रश्न आता आलाच नाही. तसेच मी जाहीरपणे कधी मागणी किंवा उच्चार केला नाही. आणि सागरसुद्धा फोरसा उत्सुक नाही. ते (खा. तडस) व आम्ही भाजपमध्ये आहोत. शेवटी उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ करणार. योग्य वाटेल त्यास ते उमेदवारी देतील, पण आत्ताच पुतळे जाळण्याची भाषा करणे शोभत नाही. मी काही तेली समाजाचा विरोधक नाही किंवा कट्टर कुणबी समर्थक नाही. आजवरच्या राजकारणात मी सर्वाना सोबत घेऊन चाललो. माझ्या संस्थांमध्ये सगळेच काम करतात. मी त्यांना (खा. तडस) गेल्या २५ वर्षांत काय मदत केली, हे सर्व जगाला माहीत आहे. त्याचा उजाळा करीत नाही. म्हणून त्यांनी अशी भाषा ऐकून घेणे दुर्दैवी आहे. मेळाव्यात माझ्या नावानिशी बोलले गेले, म्हणून माझेही मत व्यक्त करणे आवश्यक वाटते, अशी भावना मेघे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

गुरू-शिष्यातील स्पर्धेला नवे वळण
कधीकाळी मेघे यांचे पट्टशिष्य म्हणून राजकारणात वावरणाऱ्या तडस यांना दोन वेळा आमदार करण्याचे श्रेय मेघेंना दिले जाते. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या मेघेंची संगत सोडून तडस राकाँतच थांबले. २००९ची विधानसभा निवडणूक तडस भाजपतर्फे लढले. २०१४ला मेघे-तडस असा सामना रंगला होता. मेघे भाजपमध्ये आल्यानंतर कधीकाळच्या या गुरू-शिष्यातील स्पध्रेने नवेच वळण घेतले आहे. सागर मेघे हे प्रतिस्पर्धी ठरत असल्याच्या शक्यतेपोटी तडस समर्थकांनी मेळाव्यातून संतप्त भावना नोंदवल्या. त्याचे व्हिडीओ व्हायरल केले. त्यावर आज काही मेघे समर्थकांनी संताप व्यक्त करीत जशास तसे उत्तर देण्याची भूमिका जाहीर केली. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगलेला हा मेघे-तडस कलगीतुरा आगामी काळात अधिक गडद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:52 pm

Web Title: wardha conflict in bjp before lok sabha election datta meghe mp ramdas tadas
Next Stories
1 इंदापूर तालुक्यात विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी
2 आनंद तेलतुंबडे यांना तूर्तास दिलासा, १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
3 प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?, राष्ट्रवादीचा पूनम महाजन यांना सवाल
Just Now!
X