राज्यात एकीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने विरोधक राज्य सरकारवर ताशेरे ओढत योग्य नियोजन न केल्याचा आरोप करत टीका करत आहेत. मात्र एकीकडे सभागृहात विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असताना त्यांच्यातील एक नेता खासगी कार्यक्रमात डान्स करण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे. वर्धा जि्ह्यातील आर्वी येथील काँग्रेस आमदार अमर काळे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यावेळी राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असल्याचं विसरुन ते लग्नाच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. जनतेसमोर राज्य सरकारवर टीका आणि खासगीत अशा प्रकारे डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

राज्यात पर्जन्य कमी झाल्याने 151 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला. 28 हजार 524 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली. चारा बियाणे पुरवठय़ातील नियोजनशून्यतेमुळे वर्धा जिल्हय़ावर भीषण टंचाईचे संकट उभे राहिले असून पाऊण लाखांवर जनावरे मरणपंथाला लागल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला दिलासा देत मदत करण्याऐवजी काँग्रेस आमदार अमर काळे खासगी कार्यक्रमांममध्ये सेलिब्रेशन करण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमर काळे यांचा चुलतभाऊ प्रीतम काळे यांच्या विवाहनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमर काळे नाचत होते. व्हिडीओत अमर काळे अगदी उत्साहात नाचत असून यावेळी तेथे उपस्थित पाहुणे त्यांना सोबत देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपुर्वीचा आहे.

डान्सचा दुष्काळाशी संबंध जोडू नये – अमर काळे
दरम्यान अमर काळे यांनी प्रतिक्रिया देताना बहिणींनी आग्रह केल्याने नाच करावा लागला असं सांगितलं आहे. ‘माझ्या चुलत भावाला आई,वडील नाहीत. मीच प्रमुख असल्याने सर्व कार्यक्रमात सहभागी झालो होतो. बहिणींनी आग्रह केल्याने मला नाच करावा लागला. घरीच दुष्काळ आहे त्यामुळे प्रत्येक घडामोडीत लक्ष घालत असून गावोगावी भेट देत आहे. या घटनेशी कृपया त्याचा संबंध जोडू नये. माझे सार्वजनिक वर्तन निष्कलंक राहिले आहे याची आठवण ठेवावी’, असं त्यांनी म्हटलं आहे.