प्रशांत देशमुख

करोनाबाधित निघालेले उपजिल्हाधिकारी हे विलगीकरणाचा नियम मोडून घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्याची नवीन डोकेदुखी प्रशासनापुढे निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बाहेर पडल्यानंतर त्यांनी भेट दिलेल्या खासगी दवाखान्यातील डॉक्टरसह सर्वच कर्मचाऱ्यांचे आता विलगीकरण करण्यात आले आहे.

विलगीकरणात असतांनाही वारंवार घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे प्रशासन काळजीत पडले होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर दहा हजार रूपयाचा दंड ठोठावण्याचा नियम लागू झाला. मात्र, प्रशासनात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांनीच हा नियम मोडल्याचे आता दिसून आले. ते धुळे येथून काही दिवसापूर्वीच परतले होते. याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात राहण्याचे बजावण्यात आले होते, असे असतानाही ते आपल्या शेजाऱ्यासह वर्धेतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते.

आणखी वाचा- …तर महाराष्ट्रात न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती : शरद पवार

मात्र, यावेळी त्यांनी डॉक्टरांना त्यांचा स्त्राव तपासणीसाठी नेल्याची माहिती देत खबरदारी घेतली. डॉक्टरांनीही या माहितीनंतर काळजी घेत त्यांची तपासणी केली. ही भेट प्रशासनापासून अनभिज्ञ राहली. या विषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांना विचारणा केल्यावर आता याविषयी माहिती घेवू, असे त्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- मुलाच्या हाती पडला वडिलांचा मोबाईल, अन् कुटुंबावर आली विलगीकरणात राहायची वेळ

मात्र, संबंधित डॉक्टरांना ‘लोकसत्ता’ने विचारणा केल्यावर त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्त्राव तपासणीस गेल्याचे सांगितल्याने सर्व काळजी घेतल्याचे सांगितले. माझ्यासह दवाखान्यातील सर्व कर्मचारी कालपासून दवाखान्यातच असून इथेच त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पाटीलनगरात राहणाऱ्या या अधिकाऱ्याचा लगतच्या एका कुटुंबाशी घरोबा होता. त्यांच्याबाबत तपासणीचा निर्णय अद्याप झालेला नाही.