विदर्भात सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांना आरोग्यसेवा देणारे सावंगी रुग्णालयाचे शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटर तसेच महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय यांच्यावतीने आता करोनाग्रस्तांसाठी डॉक्टरांचा आरोग्यविषयक सल्ला घरपोच मिळणार आहे. जिल्हयात समर्पित कोविड रुग्णालयात मोठ्या संख्येने करोना रुग्ण दाखल होत असल्याने वैद्यकीय सेवेवर ताण वाढत आहे. गृह विलगिकरनातील रुग्णांना वेळेत मार्गदर्शन मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर गरजूंना त्वरित मदत मिळावी म्हणून असे केंद्र उपयुक्त ठरू शकते.

या ”डॉक्टर आपल्या दारी” वैद्यकीय सल्ला केंद्राचे उद्घाटन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते व संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

टेलीफोनिक तसेच व्हिडिओ कॉलद्वारे वैद्यकीय सल्ल्याकरिता सकाळी ९ ते दुपारी ५ या दरम्यान दूरध्वनी क्रमांक ०७१५२२५४५०५ तसेच मोबाईल क्रमांक ९३०९७५०८३८ यावर गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे.

तसेच, पूर्वनोंदणी केलेल्या करोनाबाधित व्यक्तींना नियोजित वेळेत डॉक्टर व परिचारिका घरी भेट देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी, आरोग्य व आहारविषयक सल्ला, विलगीकरणात घ्यावयाची काळजी, व्यायाम पद्धती तसेच करोनाबाधित व्यक्ती आणि संभाव्य लक्षणे असलेल्या घरातील इतर सदस्यांसाठी १५ दिवसांकरिता औषधोपचाराची बेसिक कीट देखील नाममात्र शुल्कात घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णाची गैरसोय टाळण्याकरिता कोविड पॅनल रक्ततपासणी आणि सी.टी. स्कॅन सुविधेकरिताही सदर क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या वैद्यकीय सल्ला केंद्राच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव तथा श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. बाबाजी घेवडे, मेडिसिनतज्ज्ञ डॉ. सतीश महाजन, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गौरव सावरकर, टेलिमेडिसिन केंद्रप्रमुख डॉ. सौरभ देशमुख, कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. सत्यम सुपारे, डॉ. विनोद आडे, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. पूनम सावरकर, डॉ. स्वाती मुंढे यांची उपस्थिती होती.

या टेलीमेडिसिन आणि होम केअर उपक्रमात सावंगी मेघे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सौरभ देशमुख, डॉ. सूरज सरिसे, डॉ. महेश काटकर, डॉ. अवंतिका राऊत, डॉ. राजश्री सारडा, डॉ. डिंपल टिपले, डॉ. विराज घुरडे ही वैद्यकीय चमू सहभागी आहे. गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांना व त्यांच्या परिवाराला ही सुविधा निश्चितच दिलासा देणारी राहील, असा विश्वास डॉ. राजीव बोरले यांनी यावेळी व्यक्त केला.