करोना बळीच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाचा भार कुटुंबावरच सोपविण्याचा निर्णय अखेर आज(शुक्रवार) वर्धा पालिकेने घेतला. वर्धा पालिकेच्या आज झालेल्या विशेष सभेत हा निर्णय झाल्याची माहिती मुख्याधिकारी बिपीन पालिवाल यांनी दिली.

जिल्ह्यातील दोन करोना समर्पित सेवग्राम व सावंगी रुग्णालय वर्धेतच असल्याने या ठिकाणी वर्धा तसेच लगतच्या जिल्ह्यातील व अन्य राज्यातील रुग्ण उपचारासाठी येतात, यामध्ये काहींचे मृत्यू देखील होतात, नियमानुसार त्यांच्यावर जवळच अंत्यसंस्कार करणे अपेक्षित असल्याने वर्धा पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जातात. त्याची जबाबदारी पालिकेने वसुधा संस्थेवर सोपविली आहे मात्र संस्था प्रति अंत्यसंस्कार अडीच हजार रुपये आकारते, करोना बळीच्या अंत्यसंस्काराचा खर्च पालिकेने करण्याचे निर्देश देत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निधीपण दिला होता. परंतु, आता दर दिवशी मृत्यू संख्या वाढत असल्याने हा खर्च रोज एक लाख रुपयांवर पोहोचल्याने पालिकेने प्रशासनाची मदत मागितली होती, मात्र निधी देण्याबाबत नकार देण्यात आला.

वर्धा न.प.ने जबाबदारी टाळल्याने अंत्यसंस्काराचा खर्च कोण करणार

आज लोकसत्तातून यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता, पैसे जुळविणे शक्य होणार नसल्याने व वर्धा पालिकेबाहेरील मृतदेहाचा अंत्यसंस्कार खर्च करणे समर्थनीय नसल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.  विशेष सभा घेण्यात आली त्यात करोना मृतकाच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी संबंधित कुटुंबावर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.