जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्त प्रदेश महिला काँग्रेसने राबविलेल्या ‘गरिमा अभियाना’त प्रवासी महिला मजुरांना शारिरीक स्वच्छतेच्या सुविधा किट पुरविण्यात आल्या.

महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनात सर्व जिल्ह्यातील स्थलांतरित व प्रवासात असणाऱ्या महिलांना आठ सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅकेट, एक साबण, एक कापडी पिशवी असे साहित्य देण्यात आले. टाळेबंदीमुळे असंख्य महिला परतीच्या प्रवासाला निघाल्यात, त्यांना वाटेत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य विषयक सुविधांची सोय नाही, अशा महिलांसाठी २९ मे ते १ जूनपर्यंत ‘गरिमा अभियान’ चालणार असल्याचे हेमलता मेघे यांनी सांगितले. मदतीचा कालावधी वाढू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मदत साहित्याचे बस स्थानक, रेल्वे स्थानक व अन्य ठिकाणी वाटप करण्यात आले असून आज महामार्गावर वाटप होणार आहे.

गेल्या दोन महिन्यात धान्य, शिधा, औषधी, मास्क व अन्य स्वरूपात राज्यभर मदत करण्यात आल्याचे टोकस म्हणाल्या, महिला काँग्रेसच्या डॉक्टर पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे दवाखाने आरोग्य विषयक मदतीसाठी खुले केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.