मनाई असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची लागवड करीत शेतकरी संघटनेने आज ठिकठिकाणी ‘मी पण गुन्हेगार’ या आंदोलनास प्रारंभ केला. एचटीबीटी व जीएम या जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांची लागवड करू देण्याची संघटनेची मागणी आहे.

केंद्राने या बियाण्यांवर बंदी घातली असून लागवड करणाऱ्यास पाच लाख रूपयाचा दंड व पाच वर्ष कारावासाची शिक्षा देण्याचे तरतूद आहे. मात्र याच बियाण्यांमूळे शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकते, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. जगात नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. त्यावर आधारित बियाण्यांची जगभरातील शेतकरी लागवड करीत असून त्याचा लाभ जागतिक बाजारपेठेत त्या  शेतकऱ्यास मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत अन्नधान्य व कृषीवर आधारित बाजारपेठ करण्याचे ध्येय संघटनेने व्यक्त केले. तसेच शहरातील रोजगार संपल्याने गावाकडे परतलेल्या मजूराला शेतीशिवाय पर्याय नाही. या बदलत्या स्थितीत रोजगार देण्याचे क्षमता व उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता एचटीबीटी बियाण्यातच असल्याचे संघटनेने स्पष्ट करीत आंदोलनास प्रारंभ केला.

युवा आघाडीचे कार्याध्यक्ष प्रमोद तलमले तसेच गणेश नेहारे, मारोती सलामे, नरेश वाघाडे व अन्य शेतकऱ्यांनी खातखेडा गावात बियाणे लागवड केली. टाकळी गावात मुकेश धाडवे, विशाल फाळके यांनी जनुकीय बियाणे लावले. माझ्या शेतात तंत्रज्ञान स्वातंत्र आंदोलन सुरू झाल्याचे जाहीर करीत किशोर रूईकर, महादेव गोहो, मनोहर ढवळे यांनी मजरा गावात लागवड केली. संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी हे गृह विलगीकरणा असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह घराच्या परसदारात बियाणे लागवड करीत आंदोलनात भाग घेतला. हा लढा अखंड चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.