एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने वर्ध्यातील हिंगणघाटात शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष देतेय. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.

आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जीवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. अशा शब्दात संभाजीराजेंनी आपल्या संतापाला वाट करुन दिली आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांनी हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली असल्याचं भाष्य संभाजीराजेंनी केलं आहे. हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपींचा एनकाउंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता.

काय आहे फेसबुक पोस्ट ?
“माणूसपणाला काळीमा फासणारी घटना. हे वाक्य फार हलकं वाटेल अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली.
त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे.
आयुष्याची स्वप्न डोळ्या समोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जीवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.

महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलीसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या.

याशिवाय अश्या नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे.”

पीडित तरुणीवर उपचार करताना कुटुंबाची फरफट – 

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने जाळल्यामुळे जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या तरुणीवर महागडे उपचार करताना रुग्णालय प्रशासनाच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे कुटुंबाची प्रारंभी चांगलीच फरफट झाली. शासकीय यंत्रणा मदतीच्या तांत्रिक सोपस्कारात अडकल्याने आणि राजकीय नेत्यांनी मौन पाळल्याच्या पार्श्वभूमीवर पीडिता कार्यरत असलेल्या संस्थेने केलेली मदतच कुटुंबाला दिलासा देणारी ठरली.

या दुर्दैवी घटनेनंतर जखमी तरुणीला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महागडय़ा समजल्या जाणाऱ्या या रुग्णालयात प्रारंभी पैसे भरल्याखेरीज उपचारच होत नाही. मात्र एवढे पैसे वेळीच भरण्याची कुटुंबीयांची क्षमता नव्हती. आज मोर्चात समोर मिरवणाऱ्या नेत्यांपैकी एकही त्यावेळी आर्थिक मदतीची विचारपूस करण्यासाठी पुढे आला नाही. पीडिता ही हिंगणघाटच्या विद्या विकास संस्थेत सात महिन्यांपूर्वीच वनस्पतीशास्त्राची प्राध्यापक म्हणून रूजू झाली होती. या विनाअनुदानित महाविद्यालयात संस्थेकडूनच खर्च होतो. घटना कळताच संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांनी प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांना या प्रकरणात मदत करण्याची सूचना दिली. डॉ. तुळसकर हे हिंगणघाटच्या रुग्णालयात पोहोचले. तेव्हा प्राथमिक उपचार सुरू होते. त्यांनी शल्यविशारद असलेल्या आपल्या बंधूंना दवाखान्यात बोलावून तपासणी केली व पीडितेला त्वरित नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्याची आग्रही भूमिका घेतली. रुग्णालयात प्रारंभी डॉ. तुळसकर यांनी पैसे भरले. परतताना संस्थेच्या दोन शिक्षकांजवळ स्वत:चे एटीएम कार्ड ठेवून सर्व खर्च करण्याची सूचना केली. आज रुग्णालयाने पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा  मुलीच्या वडिलांनी पंधरा हजार रुपये भरले. मात्र त्यापूर्वी रुग्णालयाचे एक लाख रुपयाचे शुल्क  प्राचार्य डॉ. तुळसकर यांनी भरले. पीडित तरुणीसाठी पुढेही सर्व ती काळजी घेऊ, असे प्राचार्य तुळसकर म्हणाले.

रुग्णालय प्रशासनाने आज दुपारी ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. शासनाने केलेली तोंडी सूचना रुग्णालय ऐकण्यास तयार नव्हते. सायंकाळी सहा वाजता अखेर उपविभागीय अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय प्रशासनाशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे कुटुंबाचे हितचिंतक राजू कारेमोरे यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले. पीडितेवरील उपचार थांबले नाही, मात्र शासकीय लालफितशाहीचा फटका कुटुंबाला बसला.

उपचारांचा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून

मृत्यूशी झुंज देत असलेल्या हिंगणघाट येथील दुर्दैवी तरुणीवरील सर्व वैद्यकीय उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. नॅशनल बर्न्‍स इन्स्टिटय़ूटमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्यावरील उपचारांसाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे. या तरुणीवर मुंबईत किंवा परदेशातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चांगले वैद्यकीय उपचार करण्याची सोय राज्य सरकारने करावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

’ या तरुणीवर उपचार करण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याची सूचना रुग्णालयाने केल्यास राज्य सरकारची त्यासाठी तयारी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून सर्व खर्च करण्याचे निर्देश दिले असून आरोपीला जलदगतीने शिक्षा व्हावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. या आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे.