करोनाबाधीत रूग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करतांना पारंपारिक संस्कार कटाक्षाने टाळण्याची सूचना वर्धा जिल्हा प्रशासनाने केली आहे. वर्धा जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू करोनाने झाल्याचे मृत्यू पश्चाात झालेल्या तपासणीत आढळून आले होते. मात्र त्या महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी नियमांचे पालन न झाल्याने संपर्कातील असंख्य व्यक्तींचा शोध प्रशासनास घ्यावा लागला.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यातल्या वरिष्ठांशी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे संवाद साधत त्यांना काही सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी करोनाबाधीताचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना लेखीपत्र देवून अंत्यविधीबाबत सूचना द्याव्यात. पार्थीव उघडणे, आंघोळ घालणे, हार टाकणे, नमस्कार करणे, असे कोणतेही कार्य होणार नाही. या विषयी अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देण्याचे सुचित करण्यात आले.

संशयीत रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती रूग्णालयाने पोलिसांना देण्याची बाब जि.प. मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी निदर्शनास आणली. तपासणीसाठी १ हजार १५० आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात हे पथक नियमित जात असले तरी शहरी भागात हे काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. प्रतिबंधीत क्षेत्रात ये‑जा करण्यासाठी एकच प्रवेशद्वार असण्याची सूचना पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केली. रात्री अपरात्री सेवेचे काम करणाऱ्यांना प्रवेशपत्र असल्यासच सोडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाहेरून येणारे लोकं स्थानिक लोकांमध्ये मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सुचित करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनीही काही सूचना केल्या.