टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रतिसाद मिळायला उशिराने सुरूवात झाली आहे. मोठ्या व छाट्या उद्योगात पंधरा हजारावर कामगार रूजू झाल्याची आकडेवारी आहे. वर्धा जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांपैकी उत्तम गालवा मेटॅलिक्स, उत्तम गालवा स्टील, महालक्ष्मी स्टील, व्हिल्स इंडिया लिमिटेड, गिमाटेक्स, पिव्ही टेक्स, अशा अन्य कंपन्यांची चाके फिरायला लागली आहेत.

एमआयडीसी उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे म्हणाले की, ९५ टक्के उद्योग या पसिरात कार्यरत झाले आहेत. उद्योगांना लागणारा खर्च माल इतर जिल्ह्यातून व राज्यातून नियमानूसार येत असून या ठिकाणची उत्पादन अन्यत्र पाठविणे सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. २० एप्रिल पूर्वी ८० उद्योग सुरू होते. तर २० एप्रिल नंतर १३५ उद्योग सुरू झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे शिवकुमार मुद्देमवार यांनी सांगितले.

या खेरीज किरकोळ प्रमाणात सुरू झालेल्या लघु उद्योगात पाच हजार कामगार कामावर आल्याचे त्यांनी नमूद केले. संसर्ग थांबविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे उद्योग वगळता इतर सर्व उद्योगांना टाळे लागले होते. सॉफ्टवेअर कंपन्यांनी नोकरदारांना घरून काम करण्याची मुभा दिली. मात्र वस्तू उत्पादन क्षेत्रात अशी सवलत शक्य नसल्याने या उद्योगांचे शटर डऊन झाले होते. या पाश्र्वाभूमीवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आवश्यक ते नियम पाळत सर्व क्षेत्रातील उद्योग हळूहळू मार्गी लागत असल्याचे चित्र आहे.