आपत्कालिन परिस्थितीमध्ये पंतप्रधान सहायता निधीमध्ये दान करण्याकरीता पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्यावतीने सर्व कर्मचा-यांनी स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केले.

कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्यावतीने अध्यक्ष पी. एल. तापडिया यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना आज १९ लाख २० हजार ६४८ रुपयांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सुपुर्द केला. यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव बी. एस. गर्ग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. एन. एम. गगणे यांची उपस्थिती होते.

कोविड-19 महामारी ही संपूर्ण देशासाठी आव्हान आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत देशाला मदतीची गरज आहे. त्यामुळे कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचा-यांनी मदत देण्याचे ठरविले असे तापडिया यांनी सांगितले.

या मदतीसाठी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान, कस्तुरबा हॉस्पिटल, कस्तुरबा नर्सिंग स्कूल आणि कस्तुरबा कॉलेजच्या १,०७७ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले. या गांधीवादी संस्थेच्या स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयास कोविड चाचणी प्रयोगशाळेचा दर्जा यापूर्वीच बहाल करण्यात आला आहे.