टाळेबंदीच्या काळात वर्धेत घडलेला पाहूणचार लक्षात ठेवून कामासाठी परत वर्धेतच येणार, असा शब्द देत उत्तर प्रदेशच्या मजुरांनी आज परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला.

अन्य काही जिल्ह्यात टाळेबंदी झाल्यानंतर परतीच्या प्रवासात दोनशेवर मजूर वर्धेत अडकून पडले होते. त्यांची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्यावतीने नवजीवन छात्रालय व अन्य ठिकाणी करण्यात आली होती. प्रवासाची संमती मिळाल्यानंतर या मजुरांना खास निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधिक्षक डॉ. तेली, जि.प. मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे, स्वयंसेवी संस्थेचे डॉ. सचिन पावडे व प्रदीप बजाज प्रामुख्याने उपस्थित होते.

मजुरांतर्फे  बोलतांना राममनोहर वर्मा  म्हणाले, येथील जेवण उत्तम होते. हा खास पाहुणचार कायमचा लक्षात राहील. इथल्या लोकांनी जेवणच नव्हे तर जीवनावश्यक सहित्यासोबतच कपडे, चप्पल व सोबत प्रवासाच्या जेवणाचे डबेही दिले. परतीच्या प्रवासाच्या तिकिटांचीही व्यवस्था केली. उपकारापलीकडे हा अनुभव असल्याचे वर्मा यांनी साश्रू नयनांनी सांगितल्यावर उपस्थित हेलावून गेले होते. परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर परत या जिल्ह्यात कामावर आल्यास तुमचे स्वागतच करू, असा शब्द प्रशासनाने यावेळी दिला.

नागपूरवरून विशेष रेल्वेने ही मंडळी लखनौला जाणार आहे. आज त्यांची नागपुरला जाण्याची व्यवस्था मेघे अभिमत विद्यापीठ व जय महाकाली शिक्षण संस्थेच्या गाड्यातून करण्यात आली होती. तिकिटांचा खर्च स्वयंसेवी संस्थांनी केला. तत्पुर्वी सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले होते.