वर्धा येथे जम्बो कोविड केंद्र स्थापन करण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी आज(शुक्रवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना यासंदर्भात मदतीची विनंती केली. तर, प्राणवायू गळतीच्या घटना घडू नये म्हणून जिल्हयातील रूग्णालयं व आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देण्यास जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला आहे.

वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा वाढत्या रूग्णसंख्यामूळे प्रभावित झाली आहे. या स्थितीत नवीन आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी विनंती खासदार तडस यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आजच्या भेटीत केली. असे केंद्र स्थापन करण्याबाबत सामाजिक दायित्व निधीतून मदत होवू शकण्याची शक्यता असल्याने त्यासाठी सहकार्य करण्याबाबत फडणवीस यांनी आश्वास्त केल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली आहे.

तसेच, केंद्राने सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून देण्याची सूचना उद्योगांना केली आहे. चर्चेत याकडे लक्ष वेधण्यात आले. वर्धा लोकसभा क्षेत्रातील करोना संसर्गाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जम्बो केअर सेंटर, प्राणवायू पुरवठा, रेमडेसिविरचा पुरवठा, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, लसीकरण याविषयी चर्चा झाली.

भारतीय जनता पार्टीतर्फे लवकरच कोविड केंद्र व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक असलेले वैद्यकीय मनुष्यबळ व तांत्रिक मदत उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. प्रशासनासोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वाासन फडणवीस यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनासोबत या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी पूढाकार घेण्याची विनंती फडणवीस यांना केल्याची खासदार तडस यांनी नमूद केले.

प्राणवायू गळतीच्या घटना घडू नये यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तज्ज्ञांची नियुक्ती –
प्राणवायू गळतीच्या घटना घडू नये म्हणून सेवा देण्यास खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पूढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व करोना रूग्णालय व आरोग्य केंद्रात ऑक्सिजन पूरवठा करणारी वाहिनी सुस्थितीत राहण्यासाठी त्याची दैनंदिन तपासणी आवश्यक ठरते. तसेच आग प्रतिबंधात्मक आणि बचाव आराखड्याची तपासणी आवश्यक ठरते. यासाठी जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घेतला आहे.

याला खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. आता जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्राणवायू पूरवठा सुरळीत होत असल्याबाबत दैनंदिन तपासणी करण्याची जबाबदारी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने घेतली आहे. सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशॅलिटी रूग्णालयाबाबत अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनिअरींगचे तज्ज्ञ दक्ष असतील. सेवाग्रामच्या कस्तूरबा गांधी रूग्णालयाची जबाबदारी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाने घेतली आहे. हिंगणघाटच्या उपजिल्हा रूग्णालयावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था लक्ष ठेवेल. आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयातील प्राणवायू पुरवठ्याबाबत शासकीय तंत्रनिकेतन अहवाल सादर करतील. नियुक्त केलेल्या तज्ज्ञ व्यक्ती प्राणवायू पुरवठ्याबाबत काटेकोर तपासणी करून अहवाल देणार आहेत.