प्रशांत देशमुख

होम क्वारंटाइनमध्ये असल्याने एकाकी पडलेल्या कुटुंबाला खासदार, आमदार आणि वरिष्ठांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष भेट देत त्यांना दिलासा दिला.

जिल्ह्यातील सात हजार क्वारंटाइनमधील कुटुंबांना फिजिकल डिस्टंसिंग ठेवण्याचा सल्ला देतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे ‘घरी रहा, करोना योध्दा व्हा’ असे पत्र या भेटीदरम्यान देण्यात आले. गेल्या सात दिवसात सात हजार नागरिकांनी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सोयीनुसार त्यांचे संस्थात्मक व गृहविलगीकरण करण्यात येत आहे. या कुटुंबांनी प्रतिसाद द्यावा म्हणून आज विशेष मोहिम राबविण्यात आली.

खासदार रामदास तडस यांनी काही कुटुंबांना आज भेट देताना करोनाच्या लढाईत आपणही एक सैनिक व्हावे, असे आवाहन केले. आजच क्वारंटाइनमध्ये असलेल्या कुटुंबातील तिघे जण करोनाबाधित असल्याचे दिसून आल्याने ही मोहिम गांभीर्यपूर्वक अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला. बाहेरून आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण कुटूंब विलगीकरणात ठेवण्यात येत असल्याने त्याचा बाऊ न करता कुटुंबाने सहकार्य करावे, अशी विनंती आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली.

आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जि. प. मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली तसेच नगराध्यक्ष अतुल तराळे (वर्धा), प्रेम बसंताणी (हिंगणघाट), प्रशांत सव्वालाखे (आर्वी) व अन्य मान्यवरांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी अभियानात भाग घेतला होता.