प्रशांत देशमुख, लोकसत्ता 

वर्धा : करोना साथीचा सर्वाधिक फटका सहन करणाऱ्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी नानातऱ्हेने कोंबडय़ांची विल्हेवाट लावली. मात्र अशाही स्थितीत पाच लाख अंडी व सव्वा लाख कोंबडय़ांची जपणूक करणाऱ्या आष्टीतील वर्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेला ग्राहक परतण्याची आशा आहे.

आष्टीत वर्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे हे उदाहरण आहे. करोना विषाणूच्या साथीचे तांडव कुक्कुटपालन व्यवसायावर सर्वाधिक मारा करणारे ठरले. राज्यभरात अशा व्यावसायिकांनी तमा न बाळगता कोंबडी व पिल्लांची वासलात लावली. त्याबद्दल गुन्हेही दाखल झाले. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने झालेले नुकसान अपरिमित असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. खास अंडीपालन व्यवसाय करणाऱ्या वर्धा सहकारी कुक्कुटपालन संस्थेकडे सव्वा लाख पक्षी आहेत. गेल्यावर्षी साडेतीन रुपये प्रतिअंडी विकणाऱ्या या संस्थेला आता २ रुपये ३० पैशांच्या भावानेही ग्राहक मिळत नाही. आजपर्यंत विक्री न झाल्याने पाच लाख अंडी सुरक्षित ठेवली आहेत. पुढे पंधरा दिवस ती टिकतील. त्यानंतर नुकसानच. सव्वा लाख कोंबडय़ांचे दाणापाणी सुरूच आहे. ती झळ आहेच. मात्र तरीही कशीही विल्हेवाट लावण्याचा प्रकार संस्थेच्या सदस्यांनी केला नाही. तीनच वर्षांपूर्वी आदर्श सहकारी संस्था म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार पटकावणाऱ्या या संस्थेला नजीकच्या काळात चांगले घडेल, अशी आशा आहे.