करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा शिक्षकांनी वर्ध्यात काळी फित लावून निषेध नोंदवला.

प्रतिबंधात्मक उपाय योजनेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या कार्यात कोणतेही सुविधा नसतांना देखील शिक्षक कार्यरत आहेत. विलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती शिक्षकांना न जुमानता घराबाहेर पडतात व त्यासाठी शिक्षकांना जबाबदार ठरविले जाते. हे योग्य नसल्याची भूमिका प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी मांडली होती.

सावंगी येथे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिक्षक अनिल माळोदे यांच्या क्षेत्रात परगावातून एक व्यक्ती विनापरवानगी आला. त्या व्यक्तीचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कुटुंबास गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, सुचनांचे पालन न करता कुटुंबातील सदस्य समाजात वावरत होते. याबाबतचा अहवाल वेळेवर न दिल्याचा ठपका ठेवून माळोदे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.

वास्तवाकडे दुर्लक्ष करीत ही कारवाई करण्यात आल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. या निलंबनास विरोध म्हणून २ व ३ जून रोजी सर्व शिक्षक ‘काळी फीत’ लावून या कारवाईचा निषेध व्यक्त करणार आहेत. त्यानुसार, आपत्ती आकस्मिक पथकात कार्यरत तसेच अन्य शिक्षक कर्तव्यस्थळी व समाजात वावरतांना अशा प्रकारे निषेध नोंदवणार आहेत. या संदर्भात निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे विजय कोंबे यांनी नमूद केले आहे.