वर्धा मधील बुटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल १५ जूलैपर्यत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या उड्डाणपूलाचा समावेश वर्धा ते बुटीबोरी पॅकेजमध्ये करण्यात आला असून, वर्धेलगत सावंगी ते सालोड दरम्यान मध्य रेल्वेमार्ग आहे, त्यावर हा चार पदरी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.

तर, उर्वरित कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार रामदास तडस, प्रकल्प नियोजक खासदार अखिलेशकुमार पांडे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.एन. पागृत, रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रणव जोशी यांनी आज प्रकल्पस्थळी भेट दिली.

उड्डाणपुलाच्या कामामूळे परिसरातील रहदारीस अडचणी येत होत्या. सर्व वाहतूक नेरी मार्गे वळविण्यात आली होती. मात्र आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने जड वाहतूक नागठाणा चौकातून सालोड गावाच्या बाहेर वळती होणार आहे. नागठाणा चौकालगत पुलाच्या दोन्ही बाजूला जोडमार्ग मंजूर झाला आहे. त्यात अडचण येवू नये म्हणून सर्व तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण करण्याची सूचना खासदार तडस यांनी अधिकाऱ्यांना केली.

वळणमार्गामूळे महामार्गावरील प्रवाशांच्या व स्थानिक नागरिकांच्या इंधनाच्या खर्चात बचत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उड्डाणपूलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आभासी पध्दतीने करण्याचा विचार सुरू आहे.