व्यसनाधिन मुलांना मासिक पगार देत त्यांच्याकडून विविध जिल्ह्यात तांब्याच्या तारेची चोरी करवून घेणाऱ्या नागपूरच्या टोळीप्रमुखास साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील विविध तालूक्यात तसेच नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तांब्याची तार व पाण्याची मोटर चोरण्याचे अनेक गुन्हे या टोळीने केल्याचे उघडकीस आले आहे.

चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आझाद फारूखी मोहम्मद जूबेर हा मुळचा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील असून त्याने नागपूरातील कामठी रोड परिसरातल्या साजिद अंसारी यांच्याकडे भाड्याच्या खोलीत मुक्काम ठोकला होता. जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रान्सफार्मर फोडून त्यातील तांब्याची कॉईल चोरण्याचे गुन्हे घडत होते. या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलीस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करून या टोळीचा छडा लावण्याचे निर्देष दिले होते. समुद्रपूर येथील सुनील जीकार यांच्या जिनींगमधील तीनशे किलो कॉपर कॉईल चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. याच अनुषंगाने तपास सुरू झाला. त्यात आझाद फारूखी याचे नाव पुढे आले. अखेर नागपूरातून त्यास अटक करण्यात आली. चौकशीत हा आरोपी तांब्याची चोरी करण्यात पटाईत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर नागपूर एमआयडीसी पोलीसांकडे सात गुन्हे दाखल आहे. तो व्यसनाधीन मुलांना टोळीत सामील करुन घ्यायचा. चोरीच्या मोबदल्यात तो त्या तरुणांना महिन्याला पगार स्वरुपात ठराविक रक्कम द्यायचा.