देवळी तालुक्यातील रखवालदाराच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश आले असून जादूटोण्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह चार आरोपींना अटक केली आहे.

देवळी तालुक्यातील इंझाळा येथील मंगेश भानखेडे यांच्या शेतातील रखवालदाराची हत्या झाली होती.  श्रावण पंधराम असे या रखवालदाराचे नाव होते. ३० जानेवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली होती. याचवेळी या हल्लेखोरांपैकी एक अल्पवयीन मुलगा विहिरीत पडला होता. शेतमालक भानखेडे यांनी घटनास्थळी पोहोचताच मुलाला विहिरीतून बाहेर काढले, पण बाहेर निघताच मुलाने लगेच पळ काढला. प्रथमदर्शनी पोलिसांनी शेळ्या चोरण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांकडून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र तपासात वेगळेच रहस्य पुढे आले.

पोलिसांनी पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून हल्लेखोर पुलगावलगतच्या नाचणगावचे असल्याचे स्पष्ट झाले.

नाचणगाव येथील रमेश पाखरे यांचा मुलगा वर्षभराआधी मरण पावला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूच्या मागे श्रावण पंधराम जबाबदार असल्याचा पाखरे यांना संशय होता. पंधराम याने आपल्या मुलावर जादूटोणा केल्यानेच मुलाची तब्येत खालावली व त्यातच त्याचा बळी गेल्याच्या संशयाने पाखरे अस्वस्थ होते. याच संशयातून त्यांनी पंधरामला ठार करण्याची सुपारी नाचणगावच्या आरोपींना दिली होती. पोलिसांनी रमेश पाखरे, ईश्वर पिंजरकर, अंकुश विलास शेंडेला अटक केली आहे, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.