प्रशांत देशमुख

विदर्भात सर्वाधिक संख्येने करोना रूग्ण हाताळणारे खासगी रूग्णालय म्हणून लौकिक झालेल्या सावंगीच्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशॅलिटी रूग्णालयात पहिला करोना बळी तसेच करोनामुक्त पहिल्या रूग्णाची नोंद झाली होती. त्यास १० मे रोजी वर्ष पूर्ण झाले. तेव्हापासून ते आता वर्षपूर्ती होत असतांना कार्यरत डॉक्टर व इतर वैद्यकीय सेवकांची चमू संभाव्य तिसºया लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असून अविश्रांत सेवेचे हे पर्व आरोग्य क्षेत्रासाठी भूषणावह ठरले आहे.

८ मे २०२० ला दाखल होताच मृत्यू झालेल्या महिलेचा करोना अहवाल बाधित म्हणून आला होता. ती जिल्ह्यातील पहिली करोनाबाधित रूग्ण ठरली. तेव्हापासून पूढे प्रशासनाने कडेकोट उपाय सुरू केले.मात्र हळूहळू रूग्णसंख्या वाढत गेल्यानंतर मे महिन्यातच जिल्हा प्रशासनाने सावंगी व सेवाग्रामचे रूग्णालय अधिग्रहित करून रूग्णांना मोफत उपचार सुरू केले. परिणामी लगतच्या पाचही जिल्ह्यातील रूग्ण सावंगीच्या रूग्णालयात करोना उपचारासाठी दाखल होत गेले. वाढत्या रूग्णसंख्येच्या पाश्र्वाभूमीवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांची मोठी चमू गठीत करणे भाग पडले. संपूर्ण ३६५ दिवस व पूढेही जबाबदारी असणाºया चमूत डॉ. शौर्य आचार्य, डॉ. सुनील कुमार, डॉ. शिल्पा बावणकुळे, डॉ. विवेक चकोले, डॉ. तुषार सोनटक्के, डॉ. स्वप्नील लाहोले यांची नावे अग्रक्रमाने घेतल्या जातात. तसेच परिचारिका समन्वयक माधुरी ढोरे यांच्या नेतृत्वात आठ परिचारिकांची चमू सहाय्यकांसह अद्याप कार्यरत आहे. त्यांना मदत करणारे इतरही आहेच. परंतू या डॉक्टरांची सेवा गौरवास्पद ठरल्याचे म्हटल्या जाते. आतापर्यत ६ हजार ९१४ रूग्णांची तपासणी झाली. त्यापैकी ५ हजार ७२४ सुखरूप घरी परतले असून रूग्ण बरे होण्याचा दर ९५.२३ टक्के असा उज्वल आहे. सुरूवातीला रूग्ण कमी असल्याने खाटांची संख्या कमी होती. मात्र वेग वाढताच प्रशासनाने सावंगीवर अतिरिक्त खाटा तयार ठेवण्याची सूचना केली. आता प्राणवायू व व्हेंटीलेटरसंलग्न मिळून ६५० खाटांवर रूग्णोपचार होत आहे. त्यांच्यावर ३५२ परिचारिका, १३० डॉक्टर व १७५ आरोग्य सेवक देखरेख ठेवतात. चोवीस तास कार्यरत विशेष चमू असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी नमूद केले.

वर्षभराच्या काळात शासनाकडून दहावेळा मार्गदर्शन नियमावली आली. त्यानूसार प्रत्येकवेळी उपचार बदल करण्याची तयारी रूग्णालया ठेवावी लागली. आता बोलबाला असलेल्या रेमडिसिविरचा ऑगस्ट २०२० पर्यत उपचारात समावेशसुध्दा नव्हता. त्यापूर्वीदेखील आरोग्य खात्याने सुचविलेल्या औषधावर रूग्ण बरे करण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचा दाखला प्रशासकीय अधिकारी डॉ. विट्टल शिंदे व डॉ. महाकाळकर देतात. या दरम्यान ५० डॉक्टर, २५ परिचारिका व २५ आरोग्यसेवक स्वत:च करोनाबाधित झाले. मात्र बरे झाल्यावर परत करोना रूग्णासाठी त्यांनी सेवा रूजू केली. काहींनीतर आपल्या बाळाची जबाबदारी कुटूंबाकडे सोपवित पूर्णवेळ सेवा दिली. एकाच कुटूंबातील सर्व सदस्य रूग्णम्हणून दाखल झाल्यावर केवळ उपचारच नव्हे तर सदस्यांचा परस्परांशी समन्वय साधण्याचे व धीर देण्याचे काम या परिचारिकांनी केले. सेवेसोबतच माणूसकीचा एक मोठा दाखला सफाई कर्मचारी वृंदा चौधरी यांनी निधन झालेल्या रूग्णाकडे पडून सव्वा लाख रूपये कुटूंबास परत करीत दिला. शासकीय प्रयोगशाळेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत विजय बाभूळकर यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील ७० ते ११ वयोगटातील एकूण दहा लोकं याठिकाणी रूग्ण म्हणून दाखल झाले. ते सांगतात की एक रूपयाही खर्च न करता आम्ही सर्व रूग्णालयातून तंदूरूस्त होवून बाहेर पडलो. अशी किर्ती वाढत गेल्याने परजिल्हा व परप्रांतातून रूग्ण दाखल होत गेले. शेवटी प्रशासनास केवळ जिल्ह्यातीलच रूग्णावर मोफत उपचार करण्याचे बंधन घालावे लागले.

करोना रूग्णसेवेची वर्षपूर्ती होत असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण हाताळणाºया या रूग्णालयात स्वत:चा प्राणवायू प्रकल्प नसल्याबद्दल बोट दाखविल्या जाते. संस्थेचे विश्वास्त सागर मेघे यांनी पालकमंत्र्यांच्या आढावा सभेत अतिरिक्त प्राणवायू देण्याची मागणी केली. तेव्हा रूग्णालयाची ही त्रूटी ठसठशीतपणे पूढे आली. महिन्याभरापूर्वी पूरवठा खंडीत झाल्याने प्राणवायूसाठी प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर बोलतांना प्रशासकीय अधिकारी डॉ. उदय मेघे म्हणाले की स्वत:चा प्राणवायू प्रकल्प असणे आवश्यक असल्याचे रूग्णसंख्या वाढल्यावरच जाणवले. मात्र आता दोन कोटी रूपये खर्चाचा प्राणवायू प्रकल्प प्रस्तावित असून काही काळाने तो उपयोगात येईल. शासनाला एका छोट्या प्रकल्पाची मागणी केली असून तो लगेच मार्गी लागेल. रूग्णालयात ६२६ मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्याची दैनंदिन रूग्णसंख्या हजाराच्या घरात पोहोचत आहे. त्यामूळे उपचारावरील ताण, व्हेंटीलेटरची मार्यादा, अनुषंगीक साहित्याचा तुटवडा, औषधावरील नियंत्रण या बाबी रूग्णालय प्रशासनाच्या कसोटी पाहणाºया ठरत आहे. या दरम्यान इतरही व्याधींचे रूग्ण व शस्त्रक्रियेची जबाबदारी रूग्णालयावर आहेच. त्यातून काही वादाचे प्रसंगही प्रशासनाला झेलावे लागले. ५० हजारावर करोना नमूने तपासणी करणाºया प्रयोगशाळेवर ताण येत असल्याने अहवालास होणारा विलंब तक्रारीस कारणीभूत ठरतो.

मेघे अभिमत विद्यापिठ अधिनस्थ या रूग्णालय व्यवस्थेला मार्गदर्शन करणारे कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले की उणीवांवर मात करीत आम्ही करोनाचे आव्हान ग्रामीण भागात राहूनही यशस्वीपणे परतविले आहे. राज्य शासनाने उत्कृष्ट करोना काळजी केंद्र म्हणून आम्हाला प्रशस्तीपत्र दिले. पहिल्या लाटेत केवळ ९२ मृत्यू व दुसºया लाटेत ३८६ मृत्यू झालेत. विदर्भात सर्वाधिक रूग्णसंख्या हाताळत असूनही आमच्या रूग्णालयावर हलगर्जीचा ठपका कोणी ठेवला नाही. प्रशासनाशी समन्वय साधून यापूढेही करोनाचे आव्हान झेलण्याचा निर्धार आहे.