विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ८ व्यक्तींनी दंड देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोनाबाधित भागातून कोरोना मुक्त वर्ध्या जिल्ह्यात प्रवेश होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त करतांना जिल्ह्याच्या सर्व सीमा प्रवेश बंद करण्यात आल्या आहेत. रुग्ण परवान्याखेरीज अन्य छुपे प्रवेश झाल्यास कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी निगराणी करणाऱ्या करोना नियंत्रण गाव समितीने आमगावात २, सिंदी रेल्वे येथे ३ व खापरी येथे ३ अशा एकूण ८ व्यक्तींचे चोरटे प्रवेश रोखले.

तसेच या लोकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची तहसीलदाराकडे तक्रार करण्यात आली. शेवटी साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वर्ध्यालगत सिंदी मेघे येथील दोन नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असूनही घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची कारवाई झाली.