News Flash

वर्धा : उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट देऊन प्रशासनाकडून चाचपणी

राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त चमूने दिली भेट

झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आणि गंभीर परिस्थितीत लागणारा कृत्रिम प्राणवायू याची भविष्यातील गरज लक्षात घेता, ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून उत्तम गलवा येथील आयनॉक्स या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो याची व्यवहार्यता तपासण्यासाठी आज जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले,उत्तम गलवा चे अध्यक्ष बिरेंद्रजी उपस्थित होते

भविष्यात ५ मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास एवढी मोठी गरज भागविण्यासाठी पूर्व तयारी म्हणून सद्यस्थितीत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाला लागणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवली जाऊ शकते का? याची चाचपणी राज्य शासन करीत आहे.

जिल्ह्यात उत्तम गलवा या स्टील प्रकल्पासाठी कंपनीने आयनॉक्स कंपनीचा २६४ मेट्रिक टन क्षमतेचा प्राणवायू पुरवठा प्रकल्प उभारला आहे. जिल्ह्यात भविष्यातील रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूची गरज बघता उत्तम गलवा यांच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी प्राणवायू विलगीकरण करता येऊ शकते का? याची चाचपणी आज भेट दिलेल्या चमूने केली. औद्योगिक प्रकल्पासाठी निर्मिती होणाऱ्या प्राणवायू प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी लिक्विड प्राणवायू निर्मिती करण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबी लागू शकतात? त्यावर उपाय योजना करण्यासाठी कोणत्या बाबीची गरज आहे, तसेच निर्मितीनंतर प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी बॉटलींग युनिट आदीं बाबींची पडताळणी त्यांनी केली.

उत्तम गलवा येथील प्रकल्पातून करोना रुग्णांसाठी प्राणवायू उपलब्ध झाल्यास वर्धा जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागून इतर जिल्ह्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो असे डॉ.शिंदे यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 9:27 pm

Web Title: wardha visit the oxygen project at uttam galwa and test it by the administration msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनामुळे गोकुळच्या ठरावधारकाचा मृत्यू ; सतेज पाटील – धनंजय महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप
2 सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकार महाराष्ट्रातील किती लोकांचा बळी घेणार आहे? : सचिन सावंत
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले, ४१९ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X