12 December 2019

News Flash

मुलगा मुलीला घेऊन पळाला, चिडलेल्या वडिलांनी केली मुलाच्या आईची हत्या

बेबीताई मेंढे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या कवडगव्हाण येथील रहिवासी होत्या. मेंढे यांचा मोठा मुलगा सूरज याचे गणेश काळे याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते.

संग्रहित छायाचित्र

सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या मुलगा आणि मुलीचा पत्ता लागत नसल्याने संतापलेल्या मुलीचा भाऊ  आणि वडिलाने मुलाच्या आईची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली. बेबीताई मेंढे (५०) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भाईपूर पुनर्वसन येथे ही घटना घडली.

बेबीताई मेंढे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या कवडगव्हाण येथील रहिवासी होत्या. मेंढे यांचा मोठा मुलगा सूरज याचे गणेश काळे याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, जातीमुळे गणेश काळेचा या प्रेमसंबंधांना विरोध होता. शेवटे दोघांनी पळून लग्न केले. त्यानंतर मुलाची आई बेबीताई मेंढे यांना याचा त्रास सुरू झाला. त्यांचे घर जाळण्यात आले. भीतीने त्या गाव सोडून आर्वीत राहायला आल्या. गेल्या ४ महिन्यांपासून त्या पिंपरी पुनर्वसन येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. बेबीताईंना दोन मुले आणि एक मुलगी आहे. सूरज हा गेल्या ६ महिन्यांपासून मुलीला घेऊन पळून गेला. त्याचा पत्ताच लागला नाही. मुलगी कुठे आहे हेच विचारण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणेश काळे आणि त्याचा मुलगा उमेश आणखी एक जण, असे तिघेजण आर्वीत आले. सुरुवातीला जुना वाद मिटवा, असे सांगत चहापाणी करण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने मुलगा-मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी बेबीताई मेंढे यांनी मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले.

यामुळे आरोपी संतापले. त्यांनी घराबाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक लोक जमले. एवढ्यातच उमेश याने बाहेर आलेल्या बेबीताईंवर घराच्या आवारातच धारदार शस्त्राने वार केला. यानंतर आरोपींनी पळ काढला. स्थानिकांनी गणेश काळेचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावतीला नेत असताना वाटेतच बेबीताई मेंढे यांचा मृत्यू झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी हत्येसह जातीचा वाद असल्याने अ‍ॅट्रॉसिटी सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on February 18, 2019 2:25 pm

Web Title: wardha woman murderd after her son elopes with girl from another caste
Just Now!
X