मंदार लोहोकरे

करोनाच्या संकटामुळे यंदाच्या आषाढी वारीला राज्य सरकारने मोजक्याच पालख्या आणि भाविकांना पंढरीला जाण्यास परवानगी दिली. इतर भाविकांनी आणि पंढरपूरकर वासीयांनी घरीच राहूनच पूजा केल्याने वारकरी संप्रदायाची यंदाची वारी त्यागाची ठरली.

केवळ पंरपरा राखत मानाच्या पालख्यांनी स्नान, नगरप्रदक्षिणा करून आपल्या परंपरा जोपासल्या. तर दुसरीकडे शहरात प्रवेश बंदी आणि संचारबंदी असल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाची आषाढी एकादशीचा सोहळा हा ऐतिहासिक म्हणून नोंद होईल.

संतांच्या पालख्या मंगळवारी रात्री पंढरीत मुक्कामी आल्या. एकादशीला सर्व मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या वारक ऱ्यांनी तोंडाला मुखपट्टी लावत, योग्य अंतर राखत चंद्रभागा नदी स्नान, नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

एकादशीनिमित्त पुण्यातील एका भाविकाने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा प्रवेशद्वार, गर्भगृहास आकर्षक रंगेबिरंगी फुलांची आरास केली होती. तर दुसरीकडे शहरात प्रवेश बंदी आणि संचारबंदी लागू केली. या संचारबंदीला शहरवासीयांनी पूर्णपणे पाठिंबा देत घरीच राहणे पसंत केले. दरम्यान, यंदाची चैत्र वारी देखील करोनाच्या काळात आली होती. त्यावेळीही भाविकांना पंढरीला येता आले नव्हते. आता पाठोपाठ आषाढी वारीला देखील विठुरायाचे घरात बसूनच दर्शन घ्यावे लागले. त्याचे दर्शन नाही, पदस्पर्श नाही, अगदी त्याच्या मंदिराच्या कळसाला पाहणेही नाही. अशी खंतावणारी भावना सगळय़ाच वैष्णवांच्या मनात आज दाटलेली होती. तरीही महामारीविरुद्ध लढण्यासाठी हा संप्रदाय आणि सर्व पंढरपूरकर आज आषाढीलाही घरीच बसून राहिले. घरातूनच त्यांच्या लाडक्या सावळय़ा हरीचे त्यांनी पूजन केले.