22 September 2020

News Flash

वारकऱ्यांच्या नियुक्तीने राजकीय हित साधले! 

मंदिर समितीच्या सल्लागार परिषदेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा दिसून येत आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील राजकीय निवडीवर सरकारचा ‘लाभदायी’ तोडगा

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये राजकीय लोकांना निवडल्याने वारकरी सांप्रदायातील महराज मंडळी नाराज झाली होती. मात्र सरकारने यावर तोडगा काढून समितीच्या सदस्यांच्या संख्येत वाढ करून वारकरी प्रतिनिधींना घेतले. त्याच बरोबरीने समितीसाठी जुन्या जाणत्या महाराज मंडळीना घेऊन सल्लागार परिषद स्थापन केली. हे सारे करताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने अनेक राजकीय गणिते या माध्यमातून सोडवली आहेत. तर वारकरी संप्रदायातील मंडळींच्या अनुभवाचा फायदा होणार असून आता मंदिर समितीचा कारभार जोमाने करता येईल असा विश्वास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

लाखो वैश्वांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर कायदेशीर समिती राज्य सरकारने जुल २०१७ मध्ये गठित केली. या समितीच्या अध्यक्षपदी कराडचे डॉ. अतुल भोसले यांची अनपेक्षित निवड करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वाना धक्का दिला. या समितीमध्ये ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ह.भ. प. भास्कर गिरी महाराज यांच्यासह इतर सदस्य निवडले. मात्र याच वेळेस वादाची ठिणगी पडली. आषाढी यात्रेच्या दिवशी म्हणजेच दशमीला याच दिवशी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाले होते. त्याच वेळेस पंढरपुरात संतांच्या पालख्या प्रवेश करीत असतात. त्यावेळेस या पालख्या थांबून मंदिर समिती रद्द करा, अन्यथा संतांच्या पालख्या प्रवेश करणार नाही असा पवित्रा नाराज मंडळींनी घेतला. त्याला कारण असे होते की जाहीर झालेल्या मंदिर समितीमध्ये राजकीय मंडळी असून वारकरी प्रतिनिधींना डावलले या भावनेतून आंदोलन करण्यात आले. मात्र पालकमंत्री यांनी आश्वासन देऊन आंदोलन त्यावेळेस मागे घेतले. तरीदेखील नाराज महाराज मंडळींनी पुढे आंदोलन सुरू ठेवले.

पुढे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी नाराज महाराज मंडळींशी चर्चा, बठका घेऊन समितीमध्ये योग्य बदल केला जाईल असे आश्वासन दिले. यासाठी सरकारला पंढरपूर मंदिरे अधिनियम १९७३मध्ये बदल करावा लागला. यासाठी दोन्ही सभागृहांची मंजुरी घेऊन समितीच्या सदस्यांची संख्या १२वरून १५ करण्यात आली आणि सहअध्यक्ष निवडण्यास मंजुरी दिली. यामध्ये वारकरी संप्रदायातील आणि नाराज महाराजांची निवड करण्यात आली. मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड केली. तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्यासह इतर सदस्यांची निवड केली. याचबरोबर मंदिर समितीने सल्लागार परिषदेची निवड करण्यात आली. यामध्ये पंढरपुरातील अनुभवी आणि जाणत्या मंडळीना स्थान दिले.

मंदिर समितीच्या सल्लागार परिषदेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा दिसून येत आहे. पंढरपूर मध्ये १८ जानेवारीला रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये ‘संत परिषदेचे’, आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यातील महराज मंडळींनी उपस्थिती लावली. यावेळी देहू येथील ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे यांनी समन्वयक म्हणून काम केले. तसेच गेले अनेक वष्रे मोरे महराज हे आषाढी यात्रेच्या काळात संघातर्फे वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी अनेक कामे करत आहेत. यामध्ये सुरुवातीला यवत आणि लोणी येथे ‘तात्पुरते शौचालय’, उभारण्यासाठी मोरे महराजांचे योगदान त्यानंतर ‘निर्मल वारी’, यासाठी मोरे यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांची सल्लागार परिषदेवर निवड करण्यात आले. तसेच ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर, ह.भ.प. चतन्य महराज देगलूरकर, ह.भ.प. महादेव महराज शिवणीकर, चारुदत्त आफळे यांच्यासारख्या महाराज मंडळींची निवड केली. या सर्व महाराज मंडळींच्या पाठी हजारो अनुयायी आहेत.

या साऱ्याचा विचार करता सरकारने एकीकडे नाराज महाराज मंडळींना समितीमध्ये निवड करून खूश तर केलेच. पण त्यापुढे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय गणिते सोडवली. समितीच्या सदस्यपदी आणि सल्लागार परिषदेवर महाराज मंडळीची निवड करून हजारो अनुयायांच्या मनात राज्य सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले. असे असले तरी वारकरी संप्रदायात ‘भेदा-भेद अमंगळ’ मानत नाहीत. स्त्री-पुरुष समानता मानली जाते. लहान मोठे एकमेकांचे चरणस्पर्श करतात. अशा संप्रदायात राजकारण नको असा सूर भाविकांतून येत आहे.

मंदिर समिती जोमाने काम करेल – डॉ. भोसले

राज्य सरकारने वारकरी संप्रदायातील मंडळींची निवड केल्याने समितीचे कामकाज जोमाने करता येईल. या मंडळींचा अनुभवाचा फायदा घेऊन येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देऊ, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

मंदिर समिती..

डॉ. अतुल भोसले – अध्यक्ष, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर – सहअध्यक्ष, सदस्य – आ. रामचंद्र कदम, शंकुतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, संभाजी हिरालाल िशदे, नवनिर्वाचित सदस्य..आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, ह.भ.प शिवाजीराव मोरे, अ‍ॅड माधवी श्रीरंग निगडे, नगराध्यक्षा साधना भोसले

सल्लागार परिषद

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसाठी सहअध्यक्ष आणि सहा नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. याच बरोबरीने मंदिर समितीसाठी सल्लागार समितीची निवड करण्यात आली. यामध्य मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्यासह सदस्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत राहतील. तर परिषदेचे सचिव म्हणून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारीच काम पाहणार आहेत. तसेच ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर, ह.भ.प. चतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. विठ्ठलमहाराज वासकर, ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे, सुनील रूकारी, अनिल अत्रे, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांच्या सदस्य म्हणून निवडी करण्यात आलेल्या आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सध्या महसूलचे कार्यालयाचे स्वरूप आलेले आहे हे स्वरूप बदलून ते मंदिरच आहे, हा विश्वास भक्तांमध्ये निर्माण करण्याचे आव्हान नूतन समिती व सल्लागार मंडळापुढे आहे. त्या करिता दोन गोष्टी प्रथम प्राधान्याने व्हाव्यात ही अपेक्षा आहे ते म्हणजे देवाचे दैनंदिन राजोपचार हे पूर्वीच्याच वैभवात व डामडौलात सुरू रहावेत व व्हीआयपी दर्शन व्यवस्थेला आळा बसून देवाच्या दारात सगळे सारखेच या न्यायाने सुलभ, मात्र निशुल्क दर्शन व्यवस्था करण्यात यावी.

रामकृष्ण वीर, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 3:58 am

Web Title: warkari appointment on vitthal rukmini temple committee
Next Stories
1 गिरीश महाजन यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये संभ्रम
2 कुक्कुटपालन संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्य़ात महिलांना रोजगार
3 रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र
Just Now!
X