नगर शहरातील सामाजिक न्याय भवनचे काम त्वरित सुरू न केल्यास भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) कार्यकर्ते पालकमंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजय साळवे यांनी दिला आहे. सामाजिक न्याय भवनसाठी आरक्षित केलेली जागा खासगी व्यक्तींना भाडय़ाने देण्याचा सपाटा सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी लावणार असतील तर त्याविरोधातही आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या सामाजिक न्याय भवनच्या प्रश्नावर हा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यातील जवळपास सर्वच जिल्हय़ांत हे भवन यापूर्वीच उभारले गेले आहे. नगर शहरातील कामच रेंगाळलेले आहे. भवनच्या आराखडय़ाबाबत अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत, असाही आरोप साळवे यांनी केला आहे.
सावेडीतील बसस्थानकाची जागा भवनसाठी देण्यात आली, त्यासाठी विभागाने परिवहन खात्याला ७ फेब्रुवारी २०११ रोजीच ३ कोटी १८ लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर जागा हस्तांतरितही करण्यात आली, परंतु भवन उभारण्याबाबत विभाग उदासीनता दाखवत आहे. पक्षासह विविध संघटनांनी आंदोलने केल्यानंतर विभागाचे अधिकारी वास्तुमांडणी आराखडा पाठवण्यात आल्याची खोटी माहिती देत आहेत. पाठपुराव्यानंतर तो १९ जून २०१५ रोजी पाठवला गेला, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
हस्तांतरित झालेल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्याचाही प्रस्ताव होता. प्रत्यक्षात तेथे संरक्षण भिंतही उभारली गेलेली नाही, मात्र समाजकल्याण विभागाच्या सहआयुक्तांनी (पुणे) वास्तुमांडणी आराखडय़ावर सही करण्याऐवजी ही मोकळी जागा रॅम्बो सर्कसला भाडय़ाने दिली आहे. मोकळय़ा जागेत सामाजिक न्याय भवन उभारण्याऐवजी सर्कसला परवानगी देण्यास अधिकाऱ्यांना वेळ आहे, मात्र भवन उभारण्यासाठी नाही, अशी टीका साळवे यांनी केली आहे.