पारध्यांच्या विविध मागण्यांकरिता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पारध्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनामध्ये विविध मागण्या करण्यात येणार आहेत. त्यात राज्य सरकारने पारधी समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी, पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुनर्वसनाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा, पारधी समाजातील प्रत्येक कुटुंबास सबलीकरण योजनेतून जमिनीचे वाटप करण्यात यावे, शासनाच्या गायरान, मुलकीपड जमिनी पारधी कुटुंबास महसूल विभागाकडून लँड कचेरी भरवून वहिवाटीसाठी देण्यात याव्यात, पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या चौकशीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा, आदिवासी विकास विभागाकडे प्रलंबित असणारे घरकुलांचे प्रस्ताव सत्वर मंजूर करण्यात यावेत, या मागण्यांचा समावेश आंदोलनात राहणार असल्याचे प्रकाश वायदंडे यांनी म्हटले आहे. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष सनातन भोसले, विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष कैलास पवार, सांगली जिल्हाध्यक्ष विजय आठवले, पुणे जिल्हाध्यक्ष आरटू भोसले, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ खंदारे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख चान्सलर काळे, सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा पवार, सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. आसुरी काळे, संपर्क प्रमुख पवनदादा निकम यांच्यासह कार्यकर्ते पारधी समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.