नागरिकांना जाळपोळ करण्यास भाग पाडणाऱ्या सोनपेठ पोलिसांकडून आता निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. ६०० लोकांवर गुन्हे दाखल करून शनिवारच्या पहाटे तीन वाजल्यापासून घरात घुसून अटकसत्र सुरू केले आहे. दुपापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारामार्फत सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
सोनपेठ येथे ८ जुलैला विठ्ठल मुरलीधर हाके या युवकास गुटखा विक्रीच्या आरोपाखाली अटक करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामुळे अपमानित झाल्याने विठ्ठलने ९ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत दगडफेक केली. जमावाने दिवसभर ठाण्यासमोर ठाण मांडून सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांचे खासगी वाहनही जाळून टाकले. दगडफेक आणि हवेत गोळीबार असा दिवसभर प्रकार सुरू होता. अखेर रात्री उशिरा सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे जमाव शांत झाला. या प्रकरणात तिडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांच्यासह पाटील आणि लटपटे नामक कर्मचाऱ्याची पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आणि उलट जाळपोळ करणाऱ्या ५३ नावानिशी आणि ६०० अनोळखी नागरिकांवर वेगवेगळय़ा कलमाखाली गुन्हे दाखल केले. जाळपोळ, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर कलम नागरिकांवर लावण्यात आले. दगडफेकीचा राग पोलिसांनी शनिवारी पहाटे काढण्यास सुरुवात केली. तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. नागरिकांच्या घरात घुसून अनेकांना ताब्यात घेतले. सकाळी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही अशांनाही ताब्यात घेतल्याने शहरातील नागरिक संतप्त झाले. जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव गिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, काँग्रेसचे सुहास काळे आदींच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत गृहराज्यमंत्री राम िशदे यांना निवेदन पाठविण्यात आले. जाळपोळ प्रकरणात निष्पाप लोकांना गोवल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. शनिवारी सोनपेठमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. झालेल्या प्रकरणाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करून अटकसत्र थांबवण्याची मागणी करत बेमुदत बाजारपेठ बंदचा इशाराही देण्यात आला आहे.