अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
या कमी दाबाच्या पट्टय़ाचे निलोफर चक्रीवादळात रूपांतर झाले असून हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसणार नसला तरी त्याचे परिणाम मात्र कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळणार आहे. वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सलग तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
समुद्र खवळलेला असणार असून किनारपट्टीवर ताशी ५५ ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात धोक्याचा दोन नंबरचा बावटा जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 दरम्यान, वादळी पावसामुळे कोकणातील भातशेती आणि नागली पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. भातपिके सध्या कापणीच्या प्रक्रियेत आहेत. भातकापणी करून अनेक ठिकाणी भात वाळत घालण्यात आले आहे. अशातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.