|| निखिल मेस्त्री

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची प्रशासकीय कार्यालयाला अचानक भेट; गैरहजर अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

पालघर : जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारती कामडी आणि उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाला गुरुवारी अचानक भेट दिली. अनेक वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमरेही रजेचा अर्ज न देताच गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभवन हे प्रशिक्षणासाठी गेले असल्याने त्यांचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याकडे आहे. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आल्यानंतर ते गैरहजर असल्याचा जाब उपस्थित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. ते रजेवर असल्याचे कारण  ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांनी  सांगितले. मात्र असा कोणताही रजेचा अर्ज कोकण आयुक्त कार्यालयात प्राप्त झालेला नसल्याचे आयुक्त कार्यालयामार्फत उपाध्यक्ष निलेश सांबरे यांना सांगण्यात आले. अधिकारी न सांगता गैरहजर राहत असल्यामुळे जिल्हा परिषदेची विकासकामे खोळंबत असल्याचा राग सांबरे यांनी व्यक्त केला. तसेच यापुढे अशी मनमानी खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात अचानक अध्यक्ष उपाध्यक्षांनी भेट दिल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी अनेक विभागाचे प्रमुख अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयात अधिकारी नसताना अनेक कार्यालयातील वीज-पंखे- एसी सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे सांबरे यांनी संगीतले. जिल्हा परिषदेच्या अनेक मुख्य अधिकाऱ्यांकडून हलगर्जी दिसून आली असून कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांतील जिल्हा परिषदेचा कारभार पाहिला तर काही अधिकारी-कर्मचारी सुस्तावलेले असल्याचे दिसून येते. त्यांच्या काम न करण्याच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये चुकीची ठरत आहे. असे ढिम्म प्रशासन आम्हाला कदापि चालणार नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्हा विकासाचा निधी परत गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनात पदाधिकारी म्हणून आम्हाला बदल घडवायचा असून सर्वसामान्य जनतेला जिल्हा परिषदेमध्ये स्थान मिळवून द्यायचे आहे, असे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची दांडी

  •  अध्यक्ष-उपाध्यक्ष आधी शिक्षण विभागात गेले. त्यानंतर आरोग्य विभाग व नंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयात आले. आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी गैरहजर असल्याची बाब अधिकाऱ्यांकडून लिहून घेतली.
  •  जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह आठही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत यावेळी विचारणा करण्यात आली.
  •  पुढील तीन दिवस लागोपाठ सुट्टी असल्यामुळे गुरुवारी अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती.
  •  जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे विचाराधीन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नेटवर्क नाही’

अध्यक्ष-उपाध्यक्ष यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे तारांबळ उडालेल्या व गैरहजर असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र ते असलेल्या ठिकाणचे लाईव्ह गूगल लोकेशन मागवण्यात आले. त्यावर आपण नेटवर्क क्षेत्रात नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.