सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास धोब्यांनी नकार दिला आहे. यवतमाळमध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.

यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात तीन करोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, अशा करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा विषाणू पसरत असल्याची भीती सर्वसामान्यांच्या मनात बसली आहे. त्याचाच परिणाम हा इथल्या धोब्यांवरही दिसून आला आहे, त्यामुळेच त्यांनी रुग्णालयातील करोनाग्रस्त रुग्णांचे कपडे धुण्यास नकार दिला.

दरम्यान, योग्य माहितीच्या अभावातून धोब्यांनी कपडे धुण्यास नकार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे असून याबाबत त्यांची जागृती करुन प्रश्न सोडवण्यात येईल. तसेच रुग्णांचे कपडे विशिष्ट निर्जंतुकीकरणाच्या द्रावणात दोन दिवस भिजत ठेऊन नंतर ते धुण्यात येणार असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १६६वर

देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या १६६वर पोहोचली आहे. तसेच ५७०० पेक्षा अधिक लोकांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, सैन्यामध्ये देखील करोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. देशातला करोनाग्रस्ताचा हा तिसरा मृत्यू आहे.

पुण्यात बुधवारी आणखी एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती फ्रान्स आणि नेदरलँडचा प्रवास करुन आली आहे. त्यामुळे पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९ वर पोहोचली असून त्यामुळे महाराष्ट्रातील आकडा ४५वर पोहोचला आहे.