31 March 2020

News Flash

रायगडातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर

वाढत्या नागरीकरणामुळे त्यातुन उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

भौगोलिक दृष्टय़ा मुंबईजवळ असल्याने रायगड जिल्ह्य़ात नागरिकीकरणाला वेग आला आहे. पनवेल, उरण, खालापूर, पेण, कर्जत आणि अलिबाग तालुक्यात शहरीकरणाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र वाढत्या शहरीकरणाबरोबरच त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांनाही आता तोंड फुटले आहे. या विभागात तयार होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे तरी कसे? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

मुंबईची विस्तारीकरणाची क्षमता संपत आल्याने आता शहरीकरणाचा केंद्रबिंदू रायगडच्या दिशेने सरकला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबईपाठोपाठ आता तिसरी मुंबई विकसित होऊ पाहते आहे. या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिसरात नागरीकरणाचे अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. आठ हजारहून अधिक गृहनिर्माण प्रकल्प या दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अर्थातच नागरीकरणाला  गती मिळणार आहे.

पण वाढत्या नागरीकरणामुळे त्यातुन उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाची समस्याही त्यापकी एक. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्य़ात ११ नगरपालिका असून त्यापकी १० नगर पालिकांकडे स्वत:चे डंम्पिग ग्राऊंड अस्तित्वात नाही. त्यामुळे सध्या या शहरांमध्ये निर्माण होणारा कचरा शहरा लगतच्या परिसरात टाकला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय होण्याची शक्यता आहे. नगरपालिकांची ही परिस्थिती आहे. तर ग्रामपंचायतींचा विचारही करायला नको.

त्यामुळे या सर्व तालुक्यांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन्ही विषयांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने या प्रश्नांबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन आहेत. अलिबागसारख्या शहरासाठी १७ कोटींची भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि त्यावर प्रक्रिया होणे यातून अपेक्षित आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ही योजना रखडली आहे.

घनकचरा व्यवस्थापन हा तर सर्वच नगरपालिकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि कोळसानिर्मितीसारखे प्रक्रिया उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. नगरपालिकांचे उत्पन्न कमी असल्याने त्यासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. \

घनकचरा व्यवस्थापन प्रश्नाबाबत मंत्रालयात बठकीचे आयोजन रायगड जिल्ह्य़ातील घनकचरा प्रश्नांबाबत पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या दालनात आज एका विशेष बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बठकीत घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी नियोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्ह्य़ातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी या बठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष सतीश धारप, युवा मोर्चाचे महेश मोहिते, तालुका अध्यक्ष महेश मोहिते आणि शहर अध्यक्ष दामले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 1:58 am

Web Title: waste management problem in raigad
टॅग Raigad
Next Stories
1 खारेपाट पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी
2 श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी, खारभूमी कार्यालयावर मोर्चा  
3 उन्हाच्या तडाख्यामुळे चंद्रपूर, ब्रम्हपुरीत पक्षीच दिसेनासे
Just Now!
X