‘जेम’ पोर्टलवरचे यंत्र कमी क्षमतेचे

केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून कचरा प्रक्रिया यंत्र खरेदी करण्याचा नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांचा मानस तितकासा योग्य नव्हता. या पोर्टलवर नोंदण्यात आलेल्या यंत्रांची क्षमता औरंगाबादमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याला पुरेशी नाही, असा निष्कर्ष आता काढण्यात येत आहे. त्यामुळे प्रक्रिया यंत्रांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाईल, असे आता सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि स्वच्छ भारत मिशनचे संचालक उदय टेकाळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान, महापालिका हद्दीत १०७ जागांची यादी बनविण्यात आली असून, कोठे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, हे तपासून पाहिले जात आहे. शहरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्यानंतरही सुमारे १८५० टन कचरा रस्त्यावर असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

शहरात विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर बायोकल्चर टाकून तो कचरा कमी करता येईल, अशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे किमान साथीचे रोग पसरणार नाही अशी काळजी घेत आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली झाल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी विविध भागांना भेटी दिल्या. सर्व १०७ जागांची व्यक्तिश: पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिक कचरा टाकू देण्यास फारसे उत्सुक नाहीत. अगदी प्रक्रिया करू देण्यास लागणारी जागा द्यायलाही ते तयार नाहीत. कारण त्यांच्या मनात आपला भागही नारेगाव होईल की काय, अशी भीती आहे. ही भीती दूर करणे आमच्यासाठीचे प्रमुख आव्हान असेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कचरा समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालावर मुंबई येथे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. हा अहवाल मंजूर करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता आवश्यक असल्याने पुढील आठवडय़ात त्यावर निर्णय होऊ शकेल. ९ एप्रिलपर्यंत शहरातील सर्व वॉर्डामध्ये नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे, अशी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. झोन क्र. ३ मध्ये सर्वाधिक ८०० मेट्रिक टन कचरा साठला असून, झोन क्र. २, ६, ७ मध्ये २८० मेट्रिक टन कचरा साठलेला आहे. हा ओला आणि कोरडा मिसळलेला कचरा असल्यामुळे त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बायोकल्चरचा वापर करतो आहोत, असे सांगण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी शहरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विविध गट, संघटना या अभियानात सहभागी झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी केला आहे.