23 September 2020

News Flash

वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी

पालघर जिल्ह्यातून सध्या पाच नवीन प्रकल्पाची आखणी होत असून या सर्व प्रकल्पांना बहुजन विकास आघाडीने विरोध दर्शवला आहे,

(संग्रहित छायाचित्र)

बविआ, माकप पक्षांची भूमिका; दुष्काळग्रस्त भागांनाही पुरवठा

पालघर जिल्ह्यातील नद्यांमध्ये असलेले पाणी मोठय़ा प्रमाणात वाहून समुद्राला मिळत असून या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग दुष्काळग्रस्त तसेच गरज असलेल्या शहरी भागाला मिळावे, अशी भूमिका बहुजन विकास आघाडी आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे.

बहुजन विकास आघाडी तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मनोमिलनाची माहिती देण्यासाठी पालघर (मनोर) येथे संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड डॉ. अशोक ढवळे तसेच बहुजन विकास आघाडीच्या अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका स्पष्ट केली.

पालघर जिल्ह्यातील पाण्यावर जिल्ह्यातील नागरिकांचाच पहिला हक्क असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट करून समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण वसई-विरार या शहरासाठी नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसई-विरार भागात राहणारे रहिवासी अधिकतर पालघर व डहाणू तालुक्यातीळ मूळ रहिवासी असून जिल्ह्यातील अतिरिक्त पाण्याचा वापर गरजू भागात पिण्यासाठी वापरला तर त्यात काय गैर आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही भूमिका आपण यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेकदा मांडली असून त्याबाबत आपण ठाम असल्याचे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त पाण्याचा विषय पुढे घेऊन डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व जमीन ओलिताखालील आणण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे, असे सांगितले. जिल्ह्यातील जमीन भिजवून पाणी शिल्लक राहिले तर ते समुद्रात वाहून जाण्याऐवजी गोदावरी खोऱ्यात उपसून टाकल्यास मराठवाडा सुपीक होईल, असे त्यांनी सांगितले. पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्याचा प्राधान्याने पुरवठा करायला हवा, मात्र अतिरिक्त असलेले पाणी दुष्काळग्रस्त भागात नागरिकांच्या पिण्यासाठी तसेच शेतीसाठी मिळायला हवे, असे सांगून शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’प्रसंगी ही भूमिका आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली, असे त्यांनी सांगितले.

‘नव्या प्रकल्पांना विरोध’

पालघर जिल्ह्यातून सध्या पाच नवीन प्रकल्पाची आखणी होत असून या सर्व प्रकल्पांना बहुजन विकास आघाडीने विरोध दर्शवला आहे, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्ह्यातील प्रस्ताविक प्रकल्पांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले. विरार-वसई महापालिकेने बुलेट ट्रेन संदर्भातील प्रस्ताव फेटाळल्याचे सांगून गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात कोणतीही विकासकामे झाले नसल्याचा आरोप केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:29 am

Web Title: wastewater use for cities
Next Stories
1 हंडाभर पाण्यासाठी वणवण
2 वनखात्याच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्ला
3 अंत्यविधीतील फुलांपासून खतनिर्मिती
Just Now!
X