पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असून या विरोधात काँग्रेसने ठिकठिकाणी मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जळगावमधील चोपडा येथे काँग्रेसने आंदोलन केले खरे मात्र हे आंदोलन कार्यकर्त्यांच्या चुकीच्या घोषणाबाजीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘पेट्रोल- डिझेल दरवाढ…. झालीच पाहिजे’, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या असून यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांची नाचक्की झाली.

पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसतर्फे अभिनवपद्धतीने आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध केला जात आहे. जळगावमधील चोपडा येथेही काँग्रेसच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी हे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चुकीच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात सुरुवातीला ‘हमीभावाने माल खरेदी झालीत पाहिजे, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, मोदी सरकार होश मे आओ’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल- डिझेल दरवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी केली. तीन ते चार वेळा त्यांनी चुकीच्या घोषणा दिल्या. शेवटी एका नेत्याला ही चूक लक्षात आली आणि मग ही चूक सुधारण्यात आली.

पाहा व्हिडिओ:

काँग्रेसच्या आंदोलनातील ही घोडचूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अनेकांनी यावरुन काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. जळगावमध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, ४ ऑक्टोबररोजी फैजपूर येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ होत आहे. यास तीन माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, याची वातावरण निर्मिती होण्यासाठी काँग्रेस आंदोलन करत आहे.