नालासोपारा, वसई, विरार या भागात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची भीषणता दर्शवणारी घटना समोर आली आहे. पुरामुळे शववाहिनी मिळत नसल्याने अंत्ययात्रेत रिक्षेवरुन मृतदेह न्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नालासोपारा येथील पांचाळ नगरमध्ये राहणारे राजकुमार जैस्वाल (वय ४०) यांचे ९ जुलै रोजी निधन झाले. मात्र, त्याच दिवशी या शहरात पावसाने कहर केला आणि शहरात पूरस्थिती निर्माण झाली. भरपावसात जैस्वाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न होता. अंत्ययात्रेसाठी नातेवाईकही येऊ शकत नव्हते. पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शववाहिनीदेखील मिळत नव्हती. जैस्वाल कुटुंबियांनी २ ते ३ तास शववाहिनीची प्रतीक्षा केली. मात्र, शववाहिनी मिळत नसल्याने अखेर रिक्षेवरुनच मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर रिक्षेवरुनच जैस्वाल यांची अंत्ययांत्रा निघाली. मोजकी लोकंच याप्रसंगी येऊ शकली. तुळींज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.