जलजागृती सप्ताहानिमित्ताने उरण ग्रामीण भागात कृषी विभागाकडून मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांना पाण्याच्या जागृतीविषयी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. या वेळी आगामी काळात पाण्याच्या वापरावर नियंत्रणाचे महत्त्व विशद करण्यात आले.
विशेषत: ग्रामीण महिलांना या वेळी कृषी विभागाकडून योग्य माहिती देऊन घरगुती वापरातील सांडपाण्याचा वापर घराजवळील परसबागेसाठी करण्याची सूचना केली. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाण्याची बचत होऊन पिकांना मुबलक व योग्य पाणी मिळते.
कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असूनही पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेऊन वृक्ष लागवड, वनराई बंधारे, शेततळी तर रोजगार हमी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उरण मंडळ अधिकारी क्रांती चौधरी यांनी केले.
उरण कृषी विभागाकडून तालुक्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत जलजागृती अभियान जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नुकताच तालुक्यातील विधणे येथे या अभियानांतर्गत महिला मेळावा घेऊन ग्रामीण भागातील महिलांना पाण्याचा योग्य वापर व कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सविस्तर देण्यात आली.
या वेळी मेळाव्याला मोठय़ा संख्येने सहभाग नोंदविला. निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे.
त्यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करून शेतामध्ये आंतरपिके वाल, चवळी आदी पिके घेऊन पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी संबंधित कृषी पर्यवेक्षक पी. के. कदम यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी कृषी सहायक आर. पी. अजनावले, के. पी. म्हात्रे, निखिल देशमुख, िवधणे येथील कृषीसेवक विभावरी चव्हाण आदींसह मोठय़ा संख्येने गावकरी महिला उपस्थित होत्या.