News Flash

लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करणारा पथदर्शी जलसंधारण प्रकल्प

पाणीटंचाई, दुष्काळ, कमी होणारी जलपातळी इत्यादी समस्यांवर मात करून राज्याला टँकरमुक्त महाराष्ट्र करता येईल, असा मोकळ्या मदानावरील जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग येथील

| August 26, 2014 01:27 am

पाणीटंचाई, दुष्काळ, कमी होणारी जलपातळी इत्यादी समस्यांवर मात करून राज्याला टँकरमुक्त महाराष्ट्र करता येईल, असा मोकळ्या मदानावरील जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग येथील उपमुख्याध्यापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे डॉ. नितीन खच्रे यांनी साकार करून जलसंधारण कार्यात वाहून घेणाऱ्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून विकासाचा वेग वाढतो, हे येथील विश्वासनगरातील नागरिकांनी डॉ.खच्रे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन साउली बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने मदानावर रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने कूपनलिकेव्दारे उन्हाळ्यातही  मुबलक पाणी मिळते. मदानाच्या सभोवताल केवळ वृक्षलागवड झाली नाही, तर त्यास पुरेसे पाणी मिळाल्याने संवर्धन करणेही शक्य झाले आहे. २००५ मध्ये यवतमाळातच नव्हे, तर राज्यातच दुष्काळी परिस्थिती होती. याला तोंड देण्यासाठी आर्णी मार्गावरील विश्वासनगरातील नागरिक एकत्र आले. परिसरात असलेल्या  मदानातील कपूनलिकेला उन्हाळ्यात पुरेसे पाणी राहत नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरील उपाय म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग सुरू झाले. मदानातील उताराच्या दिशेने १५ बाय १५ फूट आकाराच्या आणि ७ फूट खोल शोषखड्डा तयार करण्यात आला. कूपनलिकेभोवती ३ फूट रुंद आणि ७ फूट खोल शोषखड्डा करण्यात आला. या दोन्हीत मोठे दगड आणि त्यावर छोटे दगड टाकले. त्यात माती, कचरा जाऊ नये म्हणून दगडांचा बांध करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतीने सहकार्य केले. दगड भराईची कामे नागरिकांनी श्रमदानातून केली.
शहरात सरासरी ९०० मि.मी. पाऊस होतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार शोषखड्डय़ात १० लाख लिटर पाणी मुरते. पावसाळ्यानंतर दुसऱ्याच वर्षी उन्हाळ्यातही पाणी मुबलक असल्याचे लक्षात आहे. या उपक्रमामुळे शहरातील अनेक मान्यवरांनी हे तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न तर केलाच शिवाय विविध वृत्तवाहिन्यांनी आपल्या चमू यवतमाळात पाठवून महाराष्ट्राला या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचा परिचय करून दिला. ‘मोकळ्या जागेवरील जलसंधारण विश्वासनगर पॅटर्न’असे प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे. या परिसरात ३०० फूट खोल कूपनलिकांनाही पाणी नव्हते आणि कुठलीही पाणीपुरवठा योजना नसल्याने नगरातील नागरिकांचे हाल व्हायचे. या समस्येवर मात करण्यासाठी नितीन खच्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून जलसंधारणाचा हा प्रकल्प एक पथदर्शक प्रकल्प झाला आहे. हा प्रकल्प म्हणजे तंत्र छोटे, मंत्र छोटा, पण फायदा मोठा, असा आहे. श्रमदानातून प्रकल्प उभा होत असतांना सेवाभावी व्यक्तींनी बारा ट्रक दगड विनामूल्य आणून दिले. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे ५० लाख लिटर पाणी जमिनीत मुरवले जाऊन जलपातळी वाढली.

लघुपट तयार,  मंत्र्यांनाही आवाहन
असा प्रकल्प कुठल्याही मोकळ्या मदानात, फार्महाऊसमध्ये, घराच्या अंगणात, शैक्षणिक संस्था, मंदिर, कारखाने, गावठाण, राखीव जंगल, किल्ले इत्यादी  ठिकाणी करता येतो. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची माहिती राज्यातील जनतेला व्हावी म्हणून डॉ.खच्रे यांनी एक लघुपटही तयार केला आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींना विनंती करून असा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी आता डॉ. खच्रे यांची भ्रमंती सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून तर जिल्हाधिकारी व  सी.ई.ओ.पर्यंतच्या अधिकाऱ्यांना हा प्रकल्प समजावून देण्याची मोहीमही त्यांनी हाती घेतली आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभर असा प्रकल्प राबवल्या गेला तर भूगर्भातील पातळी वाढेल, खर्चही वाचेल आणि पाणी टंचाईवर मात करता येईल, असा विश्वास डॉ.नितीन खच्रे यांनी व्यक्त केला आहे.  सी.ईओ. मल्लीनाथ कलशेटी यांनी अलीकडेच या प्रकल्पाला भेट देऊन अशा प्रकल्पाची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2014 1:27 am

Web Title: water conservation project with help of public participation
Next Stories
1 सेनेच्या पोस्टर ‘वॉर’ ची पालकमंत्र्यांकडून खिल्ली!
2 विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये ‘अ‍ॅफ्प्रो’चा स्वच्छ पाणी, आरोग्यावर भर
3 शेकडो वनकर्मचाऱ्यांच्या संपामुळे ताडोबातील व्यवस्थापन कोलमडले
Just Now!
X