२५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा एमआयडीसीकडून बंद

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : गेले तीन महिने मीरा-भाईंदरला पुरवला जाणारा २५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवठा  एमआयडीसीकडून बंद करण्यात आल्याने  शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे  हा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे धाव घेतली आहे.

मिरा भाईंदर शहरातील काशी नगर, इंद्र लोक, क्वीन्स पार्क, गोल्डन नेस्ट, नया नगर आणि पूनम सागर परिसरातील रहिवाशांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.

मीरा-भाईंदरला पूर्वी  स्टेम प्राधिकरणाकडून ८६ एमएलडी आणि एमआयडीसीकडून  ५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. २०१२ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीकडून १०० एमएलडी पाणी देण्यास मंजुरी दिली. परंतु त्यानंतर पालिकेला प्रत्यक्षात एमआयडीसीकडून १२५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. दरम्यान बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू होणार असल्याने अतिरिक्त पाणी साठय़ातील २५  एमएलडी पाणी तात्पुरत्या स्वरूपात  पुरवले जात होते. हा पुरवठाही मार्चमध्ये बंद करण्यात आला. २०१७ साली पालिकेने नवीन नळ जोडणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे १५ हजारांहून अधिक नव्या जोडण्यांची भर पडली आहे.

पालिकेला सध्या ९० ते ९५ एमएलडी इतकाच पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जात असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शहराला १२५ एमएलडी एमआयडीसीकडून पाणी पुरवठा मंजुर झाल्याची घोषणा केली होती. परंतु यापैकी २५ द.ल.ली पाणीपुरवठा पावसाळ्यापुरताच  असल्याने तो मे महिन्यात  रद्द करण्यात आल्याचे पत्र एमआयडीसीकडून महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून या यांवर गंभीर आरोप  केले जात आहेत.

अधिकाऱ्याला घेराव

पाणी पुरवठा विभागाकडून माहिती लपवण्यात आल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे.तसेच सत्ताधारी भाजप पक्षाच्या दबावामुळे मुळ समस्येला लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना त्यांच्या दालनात  काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवकांनी घेराव घातला.

काँग्रेस पक्ष खोटे आरोप करत आहे. आज शहरात १०२ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटली आहे. तसेच एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतण्यात येत असून तात्पुरती नवे तर कायस्वरूपी पाण्याची मागणी आमच्याकडून करण्यात येत आहे.
-ज्योस्त्ना हसनाळे, महापौर

सध्या शहरात अधिक पाणीपुरवठा उपलब्ध कसा होईल या कडे लक्ष देण्यात येत आहे.
-डॉ. विजय राठोड, आयुक्त