News Flash

सूर्या, उसगाव धरणाचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे वसईकरांवर पाणी संकट

तौक्ते वादळामुळे सूर्या योजनेपाठोपाठ उसगाव धरणाचा पाणीपुरवठादेखील बंद झाल्याने शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

वसई : तौक्ते वादळामुळे सूर्या योजनेपाठोपाठ उसगाव धरणाचा पाणीपुरवठादेखील बंद झाल्याने शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरू होते.

वसई-विरार शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर, उसगाव २०,  पेल्हार १० असा २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर्स पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघरजवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते. मासवण उदंचन केंद्रात ३०० हॉर्स पॉवरचे ७ पंप आहेत तर धुकणट केंद्रात ८०० हॉर्स पॉवरचे ३ आणि ६०० हॉर्स पॉवरचे चार असे एकूण १४ पंप आहेत.

दोन्ही ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होतो. उदंचन केंद्रात पाणी आणणे, ते शुद्धीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठय़ा क्षमतेची वीज लागते. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठादेखील खंडित होतो. एक मिनिट जरी वीज खंडित झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू होण्यासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणीपुरवठा बराच काळ खंडित होतो.

तौक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर पालिकेला वीजपुरवठा खंडित होण्याची भीती वाटत होती. तीच खरी ठरली. वादळापूर्वीच १६ मे रोजी सूर्या प्रकल्पाच्या मासवण येथील पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पालिकेने पेल्हार आणि उसगाव येथील धरणाच्या पंपिंग स्टेशनमधून  जनरेटरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवला होता. डिझेलवर जनरेटर सुरू होते आणि पेल्हार आणि उसगावमधून ३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा सुरू होता. परंतु सोमवारी रात्री चांदीप येथे मोठे झाड पडल्याने डिझेल पोहोचविण्याचा मार्गदेखील बंद झाला आणि पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला.

मुळात शहराला साडेतीनशे दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज असताना केवळ २३० दशलक्ष लिटर्स पाणी मिळत होते. त्यातही सूर्याचे पाणी बंद झाल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबात महावितरणशी संपर्कात आहोत, रस्त्यातील झाडांचे अडथळे दूर करून किमान पेल्हार आणि उसगवाचा पाणीपुरवठा जनरेटरच्या माध्यमातून सुरू राहील यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी दिली.

नागरिकांचे हाल

पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला असताना दुसरीकडे वीज नसल्याने इमारतींना पंपाद्वारे टाकीत पाणी चढवता आले नाही. घरातील टाकीतील पाणी जेमतेम सोमवारी पुरले, मात्र मंगळवारी लोकांचे पाण्यावाचून हाल झाले. अनेकांना तर प्यायचे पाणीदेखील मिळाले नव्हते. अनेक इमारतीमधील रहिवासी इमारतीच्या खाली असलेल्या टाक्यांमधून बादलीने पाणी आणत होते. मात्र वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांचे हाल झाले.

पालघर जिल्ह्य़ातील शहरी भाग हवालदिल

जिल्ह्यतील शहरी भागांत वीजपुरवठा नसल्याने गृह संकुलांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. नागरिकांना प्रात:विधी करिता पाणी नसल्याने महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत होते. विद्युत पुरवठा पूर्ववत होण्याबाबत कोणताही अंदाज दिला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:26 am

Web Title: water crisis vasaikars due to closure of water supply of surya usgaon dam ssh 93
Next Stories
1 पालघर, डहाणू तालुक्यांना झोडपले
2 Cyclone Tauktae : चक्रीवादळातील बळींची संख्या १३
3 आंबा बागायतदारांचे १०० कोटी पाण्यात?
Just Now!
X