पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये बक्षीस मिळविण्यासाठी चढाओढ लागलेली असताना गतवर्षी उत्कृष्ट काम करून शासनाकडून मिळालेल्या बक्षिसाची सरपंच व ग्रामसेवकाने लूट केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बक्षिसाच्या रकमेत ८५ हजार ४० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील खेर्डा गावच्या सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सरपंच सविता पोपट भंडारे व ग्रामसेवक शशिकांत पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाचे उत्कृष्ट काम करून खेर्डा गावाने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे अवघ्या १३ हजार ३०० रुपयांच्या लोकवाट्याद्वारे गावशिवाराचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे सरकारकडून द्वितीय क्रमांकाचे ७ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस या गावाने पटकावले. ही रक्कम सरपंच व ग्रामसेवकाच्या संयुक्त ग्रामनिधी बँक खात्यात २५ जानेवारी रोजी वर्ग करण्यात आली. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ही रक्कम जलसंधारणाच्या कामावर खर्च करणे अपेक्षित होते. मात्र या कामावर खर्च न करता रक्कम खात्यावर तशीच ठेवण्यात आली. त्यामुळे गावातील पाणी फाउंडेशन समितीचे अध्यक्ष सुनील लिके पाटील व सचिव भास्कर लोकरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे २४ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीच्या धास्तीने ग्रामपंचायतीने रकमेचा धनादेश गावातील पाणी फाउंडेशन समितीला दिला. मात्र बँक खात्यावर ८५ हजार ४० रुपये कमी असल्याने धनादेश वटला नाही.

त्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टी. जे. जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता ८५ हजार ४० रुपयांच्या शासकीय रकमेचा सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून विस्तार अधिकारी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच सविता पोपट भंडारे व ग्रामसेवक शशिकांत पवार यांच्याविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cup win prize money embezzle by sarpanch and gram sevak
First published on: 22-05-2018 at 22:42 IST