07 March 2021

News Flash

विक्रमगडमध्ये पाण्यासाठी वणवण

राज्य सरकारने दुष्काळी तालुका जाहीर केलेल्या विक्रमगडमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भर उन्हात रहिवाशांची पाण्यासाठी भटकंती ; पाणी योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष

राज्य सरकारने दुष्काळी तालुका जाहीर केलेल्या विक्रमगडमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आदिवासीबहुल तालुका असलेल्या विक्रमगडमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम नसल्याने रहिवाशांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

विक्रमगड तालुक्यात एक नगरपंचायत, ३९ ग्रामपंचायती आणि तीन ग्रामदान मंडळे आहेत. तालुक्याची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. तालुक्यात धामणी आणि कवडास धरण आहे, तसेच पिंजाळ, देहर्जा, सूर्या या तीन नद्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या तालुक्यातील अनेक गाव-पाडय़ांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तालुक्यातील बहुतेक सर्वच पाणीस्रोत आटले आहेत. दुर्गम भागातील विहिरी, डोह, तलावांच्या पाण्याची पातळीही मोठय़ा प्रमाणात खालावली आहे. तालुक्यातील साखरे, वाळवंडा, बाळकापरा, डेंगाची मेट, शिळ या गावांतील महिलांना तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. विक्रमगडच्या पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे या गावांमधील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कूपनलिका योजना फोल

विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावातील घोडीचा पाडा, कुडाचा पाडा, झाप पाडा येथील महिला दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून डोक्यावरून पाणी वाहून आणत आहेत. या पाडय़ांसाठी पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ४०० ते ५०० फुटांपर्यंत कूपनलिका खोदून पाण्याचा स्रोत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी मिळाले नाही, असे येथील ग्रामस्थ सुरेश लक्ष्मण कुवरा यांनी सांगितले. या गावांसाठी आणि पाडय़ांसाठी शासनाने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

पाणीटंचाई असलेल्या गावांचा सव्‍‌र्हे सुरू असून ज्या गावांत पाण्याचा स्रोत अजिबात नाही, त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत.

– प्रदीप डोल्हारे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

पाणीटंचाईवर टँकरसारखी तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे, तिथे पाणीयोजना राबवणे गरजेचे आहे.

– नीलेश साबरे, सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगड

मनोरजवळील नांदगावात पाणीसंकट

पालघर तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगावतर्फे मनोर या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

या ग्रामपंचायतीअंतर्गत सात पाडे मिळून सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. ठाणे जिल्हा असताना पाणीपुरवठा योजनेमार्फत गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. गावांतील विहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र आता विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली असून गावाला दिवसाआड पाणी मिळत आहे. एप्रिल महिन्यातच विहिरीची पातळी खालावल्याने पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रविवारी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान करून उपसा विहिरीची सफाई केली. विहिरीतून मोठय़ा प्रमाणात गाळ काढून खोली वाढवण्यात आली. त्यामुळे सध्या तरी विहिरीतील पाण्याच्या पातळीत थोडीफार वाढ झाली आहे. मात्र पातळी अशीच खालावत गेली तर पुढील काही दिवसांत भयावह पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या पडक्या विहिरी दुरुस्त करून पाणी शुद्ध करण्यात येणार असून टंचाई भासू नये यासाठी या पाण्याचा वापर करण्याचे नियोजन असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:23 am

Web Title: water distribution in vikramgad
Next Stories
1 दगडखाणीत अडकलेल्या तीन कामगारांची सुटका
2 कचऱ्यापासून घरच्या घरी गॅसनिर्मिती शक्य
3 …तर निम्मी काँग्रेस, राष्ट्रवादी शिल्लक राहिली नसती : फडणवीस
Just Now!
X