|| नीरज राऊत

७५ लाखांची नळपाणी योजना राबवूनही वेहेलपाडा गाव तहानलेलेच

पालघर : विक्रमगड तालुक्यातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीच्या वेहेलपाडा गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून पेयजल योजना राबवण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या योजनेमधून ग्रामस्थांना एकही थेंब पाणी मिळाले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या गावात अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

विक्रमगडपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेहेलपाडा पाटीलपाड्यात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदींमधून ७३.४९ लाख रुपये किमतीत पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेअंतर्गत नवीन विहीर, पंपगृह, पंपिंग यंत्रसामग्री, ऊध्र्व वाहिनी, उंच साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था तसेच महाराष्ट्र विद्युत  महामंडळाचे वीजजोडणी करणे अपेक्षित होते. या कामासाठी २०१५ मध्ये संबंधित ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले होते. ठेकेदाराने २४ महिन्यांत योजनेचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र योजना सन २०१८ मध्ये पूर्ण झाली. तरीही या योजनेतील लाभार्थी असणाऱ्या पाच ते सहा पाड्यांतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या येथील नागरिकांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

विशेष म्हणजे ही योजना कार्यान्वित झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. तरीदेखील विक्रमगड तालुक्याच्या दरवर्षी तयार करण्यात येणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये या योजनेतील काही पाड्यांचा समावेश केला जात आहे.  याचाच अर्थ पेयजल योजना प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे स्पष्ट होते. त्याच बरोबरीने वेहेलपाडा येथील काचपाडा, आळीवपाडा, कलमपाडा व तळ्याचापाडा या पेयजल योजनेअंतर्गत पाड्यांवर नवीन विंधन विहीर उभारण्यासाठी प्रत्येकी ६८ हजार रुपयांची तरतूद आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात पाणीपुरवठा विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

…तरीही दुरुस्तीवर खर्च

वेहेलपाडा गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची अंमलबजावणी जरी झाली असली तरी ती कार्यान्वित होऊ शकली नाही. या योजनेमध्ये टाकलेल्या जलवाहिन्या चोरीस गेल्या आहेत, असे येथे सांगण्यात येते. तरी त्याकडे दुर्लक्ष करून दुरुस्तीचे कारण पुढे करून या योजनेवर दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

वेहेलपाडा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आला. असे असताना सन २०२०-२१ च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात वेहेलपाड्यातील पाच पाड्यांमध्ये पाणीटंचाई असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाली नसली तरी ठेकेदाराला संपूर्ण पैसे अदा करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.

– परेश रोडगे, युवा प्रहार ग्रुप, विक्रमगड