तहानलेल्या लातूरकरांसाठी मिरजेहून पाच लाख लिटर पाणी घेऊन निघालेली पाणी एक्स्प्रेस मध्यरात्री १.३० च्या सुमारास लातूरमध्ये पोहोचली. ही एक्स्प्रेस लातूरकरांसाठी पाणी घेऊन काल सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी मिरजेतून निघाली होती.
रेल्वे वाघिण्यांमधून घेण्यात येणारे पाणी पहिल्यांदा लातूर रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत सोडले जाईल. आम्ही सर्वप्रथम पिण्याचे पाणी पुरवण्याला महत्व देणार आहोत. रेल्वे वाघिणींमधील पाण्याचे जलशुद्धीकरण केले जाईल, त्यानंतर या पाण्याचे वितरण केले जाईल अशी माहिती लातूर मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली. प्रथम हे पाणी लातूर रेल्वे स्थानकाजवळील देशमुख यांच्या विहिरीत सोडले जाईल. यासाठी रेल्वे स्टेशन ते देशमुख यांच्या विहिरीपर्यंत सहाशे मीटरची जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
लातूर जिल्हय़ामध्ये यंदा दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही येथील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. या भागातील नागरिकांना रेल्वेने पाणी पोहोचविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत रेल्वेशी चर्चा करून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री राजस्थानमधील कोटा येथून ही पाणी एक्सप्रेस रवाना करण्यात आली होती. ही लातूरकरांसाठी चाचणी तत्त्वावर जलभेट असून १७ एप्रिलपासून २५ लाख लिटर्सची रेल्वे देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.