सांगलीचे जीवन टँकर, छावण्यांवर अवलंबून
जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तालुक्यांत यंदा तसा पाऊस झालाच नाही. यामुळे टँकर अद्याप सुरू आहेत. टँकरच्या प्रतीक्षेत गावोगावी  पिंपांच्या रांगा जागोजागी दिसतात. चाऱ्याचा प्रश्न आणखी भीषण झाला आहे. एकूणच टँकर आणि चारा छावण्यांवरील इथले जीवन पुढील वर्षभर  कंठावे लागणार आहे.
जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरीच्या  २५ ते ३० टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी येथे १३३, कवठेमहांकाळ १५० आणि जत येथे १३० मि.मी. पावसाची नोंद गेल्या तीन महिन्यांत झाली आहे. अल्प पावसामुळे जिरायत शेतीतील खरीप पिके करपून गेली आहेत. आता वर्षभर जनावरांना चारा कुठला पुरवायचा ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जत तालुक्यात दरीबडची येथे एकमेव चारा छावणी असून, कवठेमहांकाळ तालुक्यात १२, आटपाडी तालुक्यात ४४, तासगाव तालुक्यात चार ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. जून महिन्यात पावसाने दमदार आगमन केल्याने प्रशासनाने घाईगडबडीने चारा छावण्या बंद केल्या. त्यामुळे या भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भीषण बनला आहे.
जिल्हय़ात सर्वाधिक भयावह स्थिती आटपाडी आणि जत तालुक्याचा पूर्वभाग या ठिकाणी आहे. तालुक्यातील १ लाख लोकसंख्या आजच्या घडीला टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जत तालुक्यातील ८० गावांतील सुमारे २ लाख, आटपाडी तालुक्याच्या २३ गावातील ९८ हजार ३१३, तासगाव तालुक्याच्या ८ गावातील ५५ हजार, खानापूर तालुक्यातील १९ गावांत ४९ हजार आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या १० गावांतील ३१ हजार लोक आज टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.
आता या भागातील शेतकऱ्यांचे डोळे परतीच्या मान्सूनकडे लागले आहेत. परतीच्या मान्सूनने जर साथ दिली तरच रब्बीचा हंगाम पदरात पडणार आहे; अन्यथा या भागातील लोकांना स्थलांतराशिवाय पर्यायच उरलेला नाही. पावसाची आता केवळ हक्काची समजली जाणारी तीनच नक्षत्रे पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही उरली आहेत. पश्चिमेकडील वारा थांबल्याशिवाय परतीच्या मान्सूनची आशा करता येत नाही. त्यामुळे दुष्काळी टप्प्यातील भूमिपूत्र मोठय़ा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.