News Flash

पुण्यातील दमदार पावसामुळे उजनी धरण भरू लागले

संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात यंदा समाधानकारक पाऊस नसताना देखील दुसरीकडे शेजारच्या पुणे जिल्ह्य़ात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात वाढू लागला आहे.

| August 5, 2014 02:30 am

संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात यंदा समाधानकारक पाऊस नसताना देखील दुसरीकडे शेजारच्या पुणे जिल्ह्य़ात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात वाढू लागला आहे. गेल्या ७ जुलै रोजी उजनी धरणातील पाणीसाठा जेमतेम वजा २८ टक्के इतका खालावला होता. परंतु त्यात सुधारणा होऊन तो आता अधिक १७ टक्क्य़ांच्या घरात गेल्याने सोलापूरचा शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्य़ात आतापर्यंतच्या सर्व नक्षत्रांच्या पावसाने निराशाच केली आहे. आतापर्यंत केवळ १२३ मिली मीटर एवढाच सरासरी पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत २६० मिमीपर्यंत पावसाचा जोर होता. परंतु यंदा एकदिवस देखील समाधानकारक पाऊस पडला नसल्याचे दिसून येते. त्याचवेळी उजनी धरणाचे भवितव्य अवलंबून असलेल्या पुणे जिल्ह्य़ातही अलीकडेपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची खालावलेली पातळी वाढू लागल्याचे दिसून येते.
गेल्या ६ जुलै रोजी उजनी धरणातील पाण्याचा साठा जेमतेम वजा २८ टक्के इतका खालावला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दगा दिला होता. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी सारे जण निसर्गाकडे याचना करीत असताना अखेर पुणे परिसरात पावसाने साथ दिली आाणि त्याचा लाभ उजनी धरणाला होऊ लागला. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत या धरणातील पाण्याची पातळी ४९२.२५२ मीटर इतकी होती, तर एकूण पाणीसाठा २०५८.३८ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाणीसाठा २५५.५७ दलघमी होता. त्याची टक्केवारी १६.८४ इतकी होती.
दरम्यान, पुण्याच्या बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग २३ हजार ६१३ क्युसेक्स (प्रतिसेकंद घनफूट) तर दौेंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग १० हजार १९८ क्युसेक होता. पाण्याचा विसर्ग किंचित कमी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी सोलापूरकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2014 2:30 am

Web Title: water in ujani dam due to rain of pune
टॅग : Solapur,Ujani Dam
Next Stories
1 चोरटय़ांचा ‘महावितरण’ला ‘शॉक’, २ वर्षांत ७४ रोहित्रांची चोरी
2 सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रानडे यांची बदली राजकीय दबावातून?
3 उद्योग स्थलांतरामागे कर्नाटक थंड हवेचे ठिकाण नाही?
Just Now!
X