खबरदारी म्हणून सूर्यवंशी प्लॉटमधील दहा कुटुंबे स्थलांतरित

सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी पातळी ३३ फुटांवर पोचली असून लोकवस्तीला सध्या तरी पुराचा धोका नाही. खबरदारी म्हणून सूर्यवंशी प्लॉटमधील दहा कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सतर्क आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार बठकीत सांगितले. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारणची दोन पथके जिल्ह्य़ात दाखल झाली असून नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून खात्री करावी,असे आवाहनही त्यांनी केले.

येथील आयर्वनि पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी ३३ फूट झाली असून कोयना धरणातील विसर्ग कमी करून तो सोमवारी दुपारी १२ वाजता ४५ हजार २६७ क्युसेक्स करण्यात आला आहे. वारणा धरणातून ११ हजार ८९४ क्युसेक, अलमट्टी धरणातून २ लाख २० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आज सकाळपासून धरण क्षेत्रात पाऊस सर्वसाधारण असून कोयना २१ मि.मी व नवजा २५ मि.मी., महाबळेश्वर येथे २३ मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील काही तासात आयर्वनि पुलाजवळील पाणी पातळी स्थिर होवून ती कमी होऊ लागेल. जिल्हा प्रशासन पूर्णत: सतर्क असून आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

कराड येथील कृष्णा पूल व भिलवडी पूल येथील पाणी पातळीचे अवलोकन केले असता गेल्या काही तासापासून पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या कोणत्याही शहरी भागात पाणी शिरले नसून खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथील दहा कुटुंबे महानगरपालिका शाळा क्रमांक एक येथे स्थलांतरित केली आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके पाचारण करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन बोटी व पंचवीस जवान आहेत. एक पथक इस्लामपूर भागात व दुसरे जिल्हा मुख्यालय येथे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे उपस्थित होते.

जिल्ह्यातील चांदोली धरणात आज सकाळी ८ पर्यंत ३४.०५ टी.एम.सी. पाणीसाठा असून सातारा जिल्ह्य़ातील  कोयना धरणामध्ये १०३.०८ टी.एम.सी., धोम धरणात १३.२७ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात १०.०१ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात २४.७९  व राधानगरी  धरणात ८.२९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. अलमट्टी धरणात ९९.१७ टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टी.एम.सी. आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे चांदोली धरणातून ११ हजार ८९४ क्युसेक्स तर कोयना धरणातून ५३ हजार ३८५ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून २ लाख ५० हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्वनि पूल सांगली येथे ३३ फूट इतकी पाण्याची पातळी आहे, (धोका पातळी ४५ फूट) तर अंकली पूल हरिपूर येथे ३७ फूट १ इंच इतकी पाण्याची पातळी आहे. (धोका पातळी ५० फूट ३ इंच).

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी ५.२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ४.२ (५१६.८), जत – निरंक (१८५.३), खानापूर-विटा  १.६ (३१९.६), वाळवा-इस्लामपूर  ६  (७२१.५), तासगाव १.५ (३८९.६), शिराळा २४.३ (१८५१.८), आटपाडी – निरंक (१८४.१), कवठेमहांकाळ १.१ (२९५.६), पलूस ४.१ (४२४) व  कडेगाव ६.८ (६८९.४).