नैऋत्य मोसमी पावसाचे लांबलेले आगमन तसेच, कमालीचा उष्मा आणि जवळपास सर्वच पाणी साठवण प्रकल्प तळ गाठून राहिल्याने बळीराजासह सर्वसामान्य जनता चिंतातूर आहे. खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर मशागतीची कामे आटोपून बळीराजाला आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कमालीच्या उष्म्यामुळे मान्सूनचे पहिले सत्र तत्काळ सुरू होऊन ते समाधानकारक राहणे गरजेचे बनले असून, अन्यथा त्याचा खरिपावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी कोयना धरणाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. धरणाचा पाणीसाठा कमी दिसत असलातरी यापूर्वीही अगदी ५.३९ टीएमसी इतका अत्यल्प पाणीसाठा राहिल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या पाणीसाठय़ापेक्षाही कमी पाणीसाठा १९७२-७३, ७४-७५, ७८-७९,८६-८७,  ९१-९२, ९४-९५, ९५-९६ या कोयनेच्या तांत्रिक वर्षांत राहिला आहे. आजचा पाणीसाठा पहाता अजून महिनाभर शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील. सध्या कोयनेचा चौथा टप्पा बंद असून, तो धरण व्यवस्थापणाने नव्हेतर वीज मंडळाने बंद ठेवला आहे. तो का बंद ठेवला आहे याबाबतची नेमकी माहिती संबंधित प्रशासनच देऊ शकेल असेही ते म्हणाले.
कोयनेचे तांत्रिक वर्ष सुरू होऊन तब्बल १२ दिवस तर, ७ जूनचा मान्सूनचा मुहूर्त पाच दिवस पुढे गेला असताना, कोयना धरण परिसरात पावसाची उघडीप कायम आहे. धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, त्यात कराड व पाटण तालुक्यातील सर्व विभागात पावसाची नोंद राहिली आहे.
सध्या कोयना धरणाची जलपातळी २,०४३.८ फूट असून, गतवर्षी ती  २,०८१ फूट ८ इंच होती. कोयनेचा पाणीसाठा १५.४७ टीएमसी (१४.६९ टक्के) पैकी १०.३५ टीएमसी (९.८३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ३२.८४ टीएमसी (३२.२० टक्के) राहिला. पैकी २७.७२ टीएमसी (२६.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.  
कोयनेच्या चालू तांत्रिक वर्षांत म्हणजेच १ जूनपासून धरण पाणलोटक्षेत्रातील कोयनानगर विभागात ४१, नवजा विभागात ४३, तर महाबळेश्वर विभागात १, एकूण सरासरी २८.३३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हाच सरासरी पाऊस  ३२३.३३, मि. मी नोंदला गेला होता. यंदा धरणाखालील पाटण व कराड तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बऱ्यापैकी कोसळला आहे. त्यात पाटण तालुक्यात सरासरी ५३ मि. मी. तर, कराड तालुक्यात ५८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजअखेर पाटण तालुक्यात सरासरी १२७.४४ तर, कराड तालुक्यात एकूण ४७.०९ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा कराड तालुक्यात सैदापूर मंडलात सर्वाधिक ७३.५ तर, इंदोली मंडलात सर्वात कमी १४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पाटण तालुक्यात कुठरे मंडलात सर्वाधिक ११४ तर, तारळे मंडलात सर्वात कमी १३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गतवर्षी आजअखेर कोयना धरण क्षेत्रात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ३८० मि. मी., पाटण तालुक्यात पाटण विभागात सर्वाधिक १७५ मि. मी. तर चाफळ विभागात सर्वात कमी २१ मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली होती. कराड तालुक्यात कोळे मंडलात सर्वाधिक ९७.९ तर, इंदोली मंडलात सर्वात कमी २.३ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.